मिठाचे अतिसेवन हानिकारक

मीठ हा आपल्या अन्नाचा महत्त्वाचा भाग आहे. मिठामुळे पदार्थांना चव येते. सोडियम आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते; परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला नुकसानही पोहोचू शकते. जास्त मिठामुळे होणाऱ्या हानीबद्दल आपण अनेकदा ऐकले असेल. जास्त मिठामुळे मधुमेहदेखील होऊ शकतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. अभ्यासानुसार, मिठाचा वारंवार वापर केल्याने अन्न अधिक चवदार बनते. मात्र त्याचे अतिसेवनही आरोग्याला हानिकारक आहे. ‘टुलाने’ विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासात याबाबत काही तथ्ये आढळून आली आहेत. या अभ्यासात ब्रिटनमधील 4,00,000 हून अधिक प्रौढांचे त्यांच्या मिठाच्या सेवनाच्या सवयींचे सर्वेक्षण करण्यात आले. अभ्यासात समाविष्ट असलेल्या लोकांना पाच श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. या श्रेणी ‘कधीही नाही’, ‘क्वचितच’, ‘कधीकधी’, ‘सामान्यतः’ किंवा ‘नेहमी’ अशा होत्या. हा अभ्यास ‘मेयो क्लिनिक प्रोसीडिंग्ज जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

संशोधकांच्या मते, अन्नपदार्थात मीठ घातल्याने पदार्थ रुचकर होऊन लोकांना अधिक अन्न खाण्यास प्रोत्साहन मिळू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि सूज येण्याची शक्यता वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मिठामुळे होणारे हे गंभीर नुकसान लक्षात घेतल्यानंतर, आता आहारातील मिठाचे सेवन कमी करावे. सॉससारख्या सोडियमयक्त पदार्थाऐवजी औषधी वनस्पती आणि लिंबाचा रस यांसारखे पर्याय वापरू शकता. हा छोटासा बदल तुमच्या आरोग्यावर जबरदस्त सकारात्मक परिणाम करू शकतो. जास्त मीठ खाल्ल्याने काही लोकांमध्ये पाणी टिकून राहते आणि सूज येते. तुम्ही जास्त मीठ खाल्ल्यास सोडियमची पातळी वाढल्याने मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो.दीर्घकाळापर्यंत जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील ऊती आणि पेशींमध्ये द्रव जमा होऊ शकतो, ज्यामुळे हाडांना नुकसान होते आणि ‘ऑस्टियोपोरोसिस’ होतो. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने डोकेदुखी देखील होऊ शकते, ज्यामुळे ‘मायग्रेन’चा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये मीठ योग्य प्रमाणात घालावे. एखादा पदार्थ अळणी असल्यास तो तसाच सेवन केला तरी काहीच हरकत नाही !






23,812 वेळा पाहिलं