पहिलं प्रेम, दहावी – प्रेमाचा प्रवास

शालेय जीवन आणि दहावीची परीक्षा हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच भावनिक क्षण असतात. याच कालखंडातील निरागस मैत्री, कोवळे प्रेम आणि निकालाच्या धांदलीत बदलत जाणारी नाती यावर अतिशय प्रभावीपणे भाष्य करणारी वेब मालिका म्हणजे ‘पहिले प्रेम – दहावी’. रोहिदास बुधाजी दगाडे यांच्या कल्पक लेखन आणि दिग्दर्शनाखाली साकारलेली ही मालिका सध्या सर्वत्र गाजत आहे. या मालिकेचा हृदयस्पर्शी प्रवास १६ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागापासून सुरू झाला. ग्रामीण भागातील शाळा, तिथले वातावरण आणि मुलांच्या मनातील गोंधळ याचे वास्तववादी चित्रण हे या मालिकेचे सर्वात मोठे यश आहे.

या मालिकेचे कथानक अविनाश, साक्षी, कोमल आणि मयूर या चार मित्रांच्या भोवती फिरते. दहावीच्या अभ्यासाचे ओझे आणि भविष्याची स्वप्ने रंगवत असतानाच ही मुले नकळत प्रेम आणि मैत्रीच्या गुंतागुंतीत अडकतात. विशेषतः कथेत जेव्हा अविनाश आणि साक्षीच्या नात्यात गैरसमजामुळे दुरावा येतो तेव्हा हा संघर्ष अधिक तीव्र होतो. हा गैरसमज दूर करण्यासाठी ऋतुजाची मदत घेतली जाते परंतु तिथेही काही कटकारस्थानांमुळे नात्यात कटुता येते. शालेय जीवनाकडून महाविद्यालयाच्या दिशेने प्रवास करताना जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या मालिकेने अत्यंत संवेदनशीलपणे केले आहे.

१६ एप्रिल २०२६ रोजी या मालिकेचा पाचवा भाग प्रदर्शित झाला असून या भागाने कथेला एका निर्णायक वळणावर आणून ठेवले आहे. महाविद्यालयाच्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर नात्यांमधील संघर्ष आणि गैरसमजांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे रंजक चित्रण या भागात पाहायला मिळते. पाचव्या भागाच्या शेवटी ही कथा ज्या वळणावर थांबली आहे त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अविनाश आणि साक्षीच्या नात्याचे पुढे काय होणार आणि ऋतुजाचा पर्दाफाश कसा होणा, हे पाहण्यासाठी चाहते आता पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अभिनयाच्या बाबतीत या मालिकेतील प्रत्येक कलाकार उजवा ठरला आहे. मंगेश दगाडे, नेहा नरवडे, मयूर कुंभार आणि पूजा देशमुख यांनी आपल्या सहज अभिनयाने शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. तांत्रिक आघाडीवर रितिक राजेश म्हस्के यांचे चित्रीकरण ग्रामीण निसर्ग आणि शाळेचा परिसर प्रेक्षकांसमोर हुबेहूब उभा करते. यातील पार्श्वसंगीत कथेतील भावूक प्रसंगांची परिणामकारकता अधिक वाढवते. १६ मार्च रोजी पहिल्या भागापासून सुरू झालेला हा प्रवास आता १६ एप्रिल रोजी पाचव्या भागासह एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असूनआता पुढच्या भागात काय होणार हे पाहणे अत्यंत रंजक ठरेल. सत्य आणि मैत्रीचा हा लढा प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करणारा आहे.






2,872 वेळा पाहिलं