एक तरी बहीण हवी

बहीण म्हणजे जगातील प्रत्येकासाठी एक वरदायी असे नाते आहे. काहींना मोठ्या बहिणी तर काहींना लहान बहिणी असतात. बहीण आपल्या भावंडांवर सारखेच प्रेम करते. मोठ्या बहिणीचा आशीर्वाद आणि लहान बहिणीच्या शुभेच्छा बहुमोल असतात. आपली बहीण सख्खी, चुलत किंवा नात्यातील असू शकते. मोठ्या बहिणीला ‘ताई’, ‘दीदी’, ‘दी’ असे म्हणण्याची परंपरा आहे. ती आपल्या आयुष्यातील मदतनीस व्यक्ती असते. भावंडाना अभ्यासात, कामात मदत करणारी, चुका पोटात घालून मोठ्या मनाने माफ करणारी एक व्यक्ती असते. तिच्या भावंडांबद्दल तिचा नेहमी चांगला दृष्टिकोन असतो. आईवडील आजूबाजूला नसताना भावंडांची विशेष काळजी घेणारी बहीण असते. भावंडांमधील विशेष बंधन प्रेमाने विणलेले असते.

बहिणीकडून आपोआप मागची भावंडे बरेच काही शिकतात. बहीण ही आयुष्यातील अशी व्यक्ती असते, जी आयुष्यभर भावंडांना आधार देते, त्यांची काळजी घेते, प्रसंगात धावून जात मदत करते. ती नेहमी भावंडांवर प्रेम करते. त्यांना चुकीच्या वर्तनांपासून दूर ठेवते. इतरांची काळजी घेणारी ही व्यक्ती असते. तिला नेहमी संपूर्ण कुटुंबाची काळजी असते. बहीण ही अशी व्यक्ती असते, की तिच्यासोबत सर्व रहस्ये भावंडे ‘शेअर’ करतात. तिच्या सोबत असण्यात एक सुरक्षितता असते. म्हणून, बहीणभावाच्या नात्याला धार्मिक संस्कारही लाभले आहेत. रक्षाबंधन, भाऊबीज आपल्याकडे आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. या नात्यात होणारी भांडणे खेळकर असतात. ती कधीच चिरकाल टिकणारी नसतात. म्हणून आयुष्यात प्रत्येकाला खूप प्रेम करणारी, रागावणारी, प्रसंगी दटावणारी एक तरी बहीण हवी !






22,263 वेळा पाहिलं