इराणमध्ये महागाईचा भडका

मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. इराणी चलन ‘रियाल’चे मूल्य ऐतिहासिक निचांकावर घसरले असून, देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन गरजांच्या वस्तू खरेदी करणेही आता आवाक्याबाहेर गेले आहे. इराण जरी लष्करीदृष्ट्या आपण युद्ध जिंकत असल्याचा दावा करत असला, तरी आर्थिक आघाडीवर मात्र देशाची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणी रियालची किंमत प्रचंड घसरली आहे. सध्या एक अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी आता साडेसोळा लाख रियाल मोजावे लागत आहेत. चलनाच्या या घसरणीमुळे आयात होणाऱ्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून स्थानिक बाजारपेठेत चलनाची विश्वासार्हता संपत चालली आहे. भारतात सामान्यतः मिळणाऱ्या वस्तूंच्या किमतींशी तुलना केल्यास इराणमधील भीषण परिस्थिती लक्षात येते. तेथे मिळणाऱ्या वस्तूंचे दर पाहून कोणालाही धक्का बसू शकतो. भारतात आठ ते नऊ रुपयांना मिळणारे एक अंडे इराणमध्ये इतके महागले आहे की, एक डझन अंड्यांचा दर पंधरा लाख रियालपर्यंत पोहोचला आहे. एक लिटर दुधासाठी सामान्य माणसाला आठ लाख रियाल खर्च करावे लागत आहेत. एक किलो तांदळाचा भाव बत्तीस लाख रियाल इतका झाला आहे. इराणमध्ये एक किलो मटण खरेदी करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये मोजावे लागत आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटल्याचा थेट परिणाम बाजारावर झाला आहे. जेडी व्हान्स आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये झालेली एकवीस तासांची प्रदीर्घ चर्चा निष्फळ ठरल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निर्बंधांमुळे तेलाची निर्यात घटली असून परकीय चलनाचा साठा संपत आला आहे. बेरोजगारी आणि गरिबीने इराणच्या जनतेला ग्रासले आहे. इराण सरकार एकीकडे शेजारील देशांशी असलेल्या वादात आणि लष्करी मोहिमांवर प्रचंड खर्च करत आहे, मात्र दुसरीकडे जनतेला दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. चलनाची ही घसरण अशीच सुरू राहिली तर देश अति-महागाईच्या गर्तेत अडकण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.






21,213 वेळा पाहिलं