कमळी – आजीसमोर येणार सत्य

झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या एका स्फोटक आणि थरारक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेचा नुकताच समोर आलेला प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला असून सोशल मीडियावर चर्चेला मोठे उधाण आले आहे.

ज्या अन्नपूर्णा आजीचा कमळीवर जीवापाड विश्वास होता त्याच आजीने विश्वासाला तडा गेल्याच्या भावनेतून कमळीला घराबाहेर काढण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. या ‘हाय व्होल्टेज’ ड्रामाने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले असून कथेत अचानक आलेल्या या वादळामुळे संपूर्ण महाजन कुटुंब हादरले आहे. अनिका, कामिनी आणि रागिणी या तिघींच्या दुष्ट कारस्थानाचा तूर्तास विजय होताना दिसत आहे कारण त्यांनी रचलेल्या कुटील डावामुळे आजीसमोर एक भयंकर खोटे सत्य मांडण्यात आले आहे.

कथेत सध्या असे पाहायला मिळत आहे की अनिकाने अत्यंत हुशारीने असा बनाव रचला आहे की कमळी ही महाजनांची खरी नात नसून ती केवळ तसे असण्याचे नाटक करत आहे. यात भर पडली ती राजनच्या कबुलीची ज्यामुळे आजीचा संशय पक्का झाला. आपल्या एका चुकीची शिक्षा कमळीला मिळणार या विचाराने राजन पूर्णपणे हतबल झाला पण त्याच्या बोलण्याने आजीचा संयम सुटला. जेव्हा अन्नपूर्णा आजीने कमळीला थेट प्रश्न विचारला की “तू खरोखरच माझी नात आहेस का?” तेव्हा सत्य लपवण्याच्या ओझामुळे आणि परिस्थितीच्या दबावामुळे कमळीला उत्तर देणे कठीण झाले. कमळीच्या तोंडून स्पष्ट ‘हो’ न ऐकल्याने आजीच्या पायाखालची जमीन सरकली आणि रागाच्या भरात आजीने सर्वांसमोर कमळीच्या कानाखाली मारून तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला.

आजीचा हा रुद्रावतार आणि कमळीचा झालेला हा अपमान पाहून कमळीच्या बाबांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. आपल्या लाडक्या लेकीवर ओढवलेली ही वेळ पाहून बाबांना आपले अश्रू अनावर झाले आहेत मात्र आजीच्या निर्णयापुढे कोणाचेच काही चालले नाही. हा प्रोमो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील निर्मात्यांना धारेवर धरले असून “नेहमी कमळीलाच का सोसावे लागते?” असा सवाल विचारला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत “आता पुरे झाले हे रडगाणे जे खरं सत्य आहे ते लवकर समोर आणा” अशी मागणी केली आहे. कमळीची आई सरोज (गौरी) हिने जर वेळीच राजनला सत्य सांगितले असते तर आज ही वेळ आली नसती असेही अनेकांचे म्हणणे आहे.

खरे तर कमळी हीच आजीची खरी मोठी नात आहे हे सर्वात मोठे सत्य सध्या केवळ सरोजला ठाऊक आहे आणि हे गुपित लपवल्याचा मोठा फटका आता कमळीला बसला आहे. प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार एप्रिल महिन्यात या मालिकेतील सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहे आणि सत्याचा विजय होणार आहे. पण तोपर्यंत घराबाहेर पडलेली निरागस कमळी आपले अस्तित्व कसे टिकवणार तिला या संकटातून कोण बाहेर काढणार आणि आजीला आपली चूक कधी उमजणार या प्रश्नांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेतील हा रंजक पेच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असून आगामी भागात कमळी या अन्यायाविरुद्ध कशी उभी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
751 वेळा पाहिलं