हिरड्यांचे आरोग्य जपावे


काहीजणांच्या हिरड्यांमधून ब्रश करताना रक्तस्राव होतो. त्याकडे ते दुर्लक्ष करतात. कधीकधी ब्रश करताना हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा हिरड्या खूप कठीण झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो; परंतु कधीकधी हिरड्यांमधून रक्त येणे हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. अशी समस्या असेल तर वेळीच सावध व्हा. हिरड्यांमधून रक्त येणे यामागे इतर अनेक कारणे असू शकतात. हार्मोनल असंतुलन, जीवनसत्वाची कमतरता आणि अगदी तणाव हे देखील याचे कारण असू शकते.
हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी ब्रश बदलून घ्या. ब्रश विकत घेताना त्याचे ब्रिस्टल्स मऊ आहेत का हे पहा. ब्रिस्टल्स कठोर असल्यास हिरड्यांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे योग्य ब्रश निवडा. दातांमध्ये असलेल्या घाणीमुळे हिरड्यांवरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मुखस्वच्छता फार गरजेची आहे. दिवसातून दोनदा ब्रश आणि फ्लॉस करा. यामुळे दातांमध्ये साचलेली घाण साफ होईल. हिरड्या निरोगी राहतील.
‘क’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ‘क’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा त्रास होऊ नये हे महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे ‘स्कर्वी’ आजारही होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त येते. संत्री आणि किवी या फळांना आपल्या आहाराचा भाग बनवा. तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमितपणे दंतवैद्याकडे जाणे आणि तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे; जेणेकरून काही समस्या असल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील. कोमट पाण्यात मीठ टाकून चूळ भरणे हेसुद्धा हिरड्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोमट पाण्याने चूळ भरल्याने हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या टाळता येते.