चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्पाचा संकल्प

पृथ्वीच्या कक्षेबाहेर मानवी वस्ती स्थापन करण्याच्या दिशेने नासाने आता आणखी एक पाऊल उचलले आहे. चंद्रावर दीर्घकाळ मुक्काम करण्यासाठी आणि तेथे मानवी वस्ती वसवण्यासाठी नासा आता चंद्राच्या पृष्ठभागावर अणुभट्ट्या बसवण्याचे नियोजन करत आहे. सूर्यप्रकाशावर अवलंबून न राहता ऊर्जेचा शाश्वत स्रोत निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. चंद्रावर सौर ऊर्जेचा वापर करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. चंद्रावरील एक रात्र ही पृथ्वीवरील सुमारे चौदा दिवसांच्या बरोबरीची असते. या प्रदीर्घ रात्रीच्या काळात सूर्यप्रकाश नसल्यामुळे सौर पॅनेल निकामी ठरतात. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, जिथे नासाचे आर्टेमिस मिशन उतरणार आहे, तिथे अनेक भाग कायमस्वरूपी सावलीत असतात. अशा परिस्थितीत, भविष्यातील अंतराळवीरांना ऑक्सिजन निर्मिती, पाणी शुद्धीकरण आणि राहण्यासाठी लागणारी उष्णता मिळावी म्हणून अणुऊर्जा हा सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरला आहे.

नासा आणि अमेरिकेचा ऊर्जा विभाग एकत्रितपणे फिशन सरफेस पॉवर प्रकल्पावर काम करत आहेत. या प्रकल्पांतर्गत सुमारे चाळीस किलोवॅट क्षमतेची अणुभट्टी तयार केली जाणार आहे. ही ऊर्जा साधारणतः दहा घरांना लागणाऱ्या विजे इतकी असेल. ही अणुभट्टी आकाराने लहान, वजनाने हलकी आणि चंद्राच्या कठोर वातावरणात किमान दहा वर्षे टिकेल अशी डिझाइन केली जात आहे. विशेष म्हणजे, ही यंत्रणा पृथ्वीवरून पूर्णपणे तयार करून पाठवली जाईल आणि चंद्रावर ती आपोआप कार्यान्वित होईल. चंद्रावर अणुभट्टी नेणे हे तांत्रिकदृष्ट्या जेवढे कठीण आहे, तेवढेच ते सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. रॉकेट प्रक्षेपणावेळी जर अपघात झाला, तर किरणोत्सर्गी पदार्थांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत. मात्र, नासाने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत ही भट्टी चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे पोहोचत नाही, तोपर्यंत ती कार्यान्वित केली जाणार नाही, ज्यामुळे प्रक्षेपणाच्या वेळी किरणोत्सर्गाचा धोका नगण्य असेल.

नासाचे चंद्रावरील हे पाऊल केवळ चंद्रापुरते मर्यादित नाही. चंद्रावर अणुभट्टी यशस्वीपणे चालवणे ही मंगळ मोहिमेची तालीम असेल. मंगळ ग्रह चंद्रापेक्षा खूप लांब असून तिथले वातावरण अधिक आव्हानात्मक आहे. जर चंद्रावर अणुऊर्जेचा प्रयोग यशस्वी झाला, तर मंगळावर मानवाचे जाणे आणि तिथे राहणे अधिक सुलभ होईल. फक्त अमेरिकाच नाही, तर चीन आणि रशिया देखील चंद्रावर स्वतःचे तळ उभारण्याच्या तयारीत आहेत. अंतराळातील संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी आता एका नव्या ‘स्पेस रेस’ला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ज्या देशाकडे ऊर्जेचा सक्षम स्रोत असेल, तो देश अंतराळ संशोधनात आघाडी घेईल. नासाची ही अणुऊर्जा योजना अमेरिकेला या शर्यतीत वरचढ ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.






2,177 वेळा पाहिलं