नॉर्थ टेकचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ४ मे २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ‘नॉर्थ टेक परिसंवाद – २०२६’ चे उद्घाटन केले. ‘रक्षा त्रिवेणी संगम – जेथे तंत्रज्ञान, उद्योग आणि सैनिकी शक्ती एकत्र येतात’ या संकल्पनेवर आधारित हा तीन दिवसीय परिसंवाद भारतीय लष्कराच्या उत्तरी आणि मध्यवर्ती सेना कमांड तसेच भारतीय संरक्षण उत्पादक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. देशी तंत्रज्ञान प्रदर्शित करणे आणि सैन्याच्या कार्यात्मक आव्हानांवर उपाय शोधणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत ते तंत्रज्ञानयुद्धाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. या मोहिमेत ‘आकाशतीर’, ‘आकाश क्षेपणास्त्र प्रणाली’ आणि ‘ब्रह्मोस’ सारख्या आधुनिक अस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला. आपल्या सशस्त्र दलांनी केवळ बदल समजून घेतले नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वासाने वापर करून आपले शौर्य सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले. या मोहिमेला एक वर्ष उलटूनही भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या आठवणींनी संपूर्ण राष्ट्राचा उर अभिमानाने भरून येतो, असे त्यांनी भावूक होऊन नमूद केले.

आजच्या बदलत्या युद्धस्थितीतील अनिश्चिततेवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी शत्रूची लष्करी क्षमता आणि शस्त्रास्त्रांचा अंदाज येणे सोपे होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून अशा अनपेक्षित गोष्टी शस्त्रे बनत आहेत, ज्यांची कोणी कल्पनाही केली नव्हती. सामान्य नागरी जीवनातील वस्तूही आता घातक शस्त्रांच्या रूपात वापरल्या जात आहेत. अशा अनिश्चित सुरक्षा वातावरणात भविष्यासाठी सदैव सज्ज राहणे, सतत संशोधन करणे आणि नावीन्यपूर्ण विचार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संरक्षण परिसंस्था बळकट करण्यावर भर देताना राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील ‘गंगा द्रुतगती मार्ग’ या प्रकल्पाचे उदाहरण दिले आणि भविष्यात असे प्रकल्प संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. शासनाने संरक्षण क्षेत्रासाठी सुरू केलेल्या ‘आयडेक्स’, ‘आदिती’ आणि ‘तंत्रज्ञान विकास निधी’ या उपक्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तींच्या वेळीही आपले सैनिक अन्न आणि औषधे पोहोचवण्यासाठी तत्परतेने काम करतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

हा परिसंवाद ६ मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. यात देशभरातील दोनशे चौऱ्याऐंशी कंपन्यांनी आपली दालने उभारली असून, यात लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योग, खासगी संरक्षण तंत्रज्ञान संस्था, नवउद्यमी आणि सैनिकी संशोधकांचा समावेश आहे. हा कार्यक्रम संरक्षण दल, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यातील सहकार्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरेल. याद्वारे राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्टता अधिक दृढ होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,749 वेळा पाहिलं