पॉलिथिनपासून पोती निर्मिती

प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर चांगला वापर करणारा उद्योग म्हणजे उच्च घनतेच्या पॉलिथिनपासून बनवलेल्या पोत्याचा उद्योग होय. या उद्योगाला बाजारपेठेत सर्वत्र मागणी असूनही प्रामुख्याने सिमेंट उद्योगात अशा पोत्यांचा वापर बहुतांशी सिमेंट भरण्यासाठी केला जातो. तंबू तयार करण्यासाठी, बागांच्या छतांसाठी विणलेल्या प्लास्टिकच्या जाड कागदाचा वापर केला जातो.
सिमेंट आणि कार्बन ब्लॅक पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. अशा पिशव्या नेहमी जलरोधक असतात. पाणी आणि आम्लाचा त्यावर परिणाम होत नाही. विणलेल्या जाड पिशव्यांना देशातील ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत मागणी असल्याने हा प्रकल्प सुरू करणे केव्हाही फायदेशीर ठरते. दुधाचे उद्योग, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू, संवर्धन विभाग आणि पूरनियंत्रण विभागात या पिशव्यांचा वापर केला जातो. बेरियम अल्कली, रंगद्रव्ये आणि स्फोटके, कच्चा माल, कीटकनाशकांच्या वाहतुकीसाठी या पिशव्या वापरतात.
अशा पिशव्यांमध्ये जास्त वजन सहन करण्याची क्षमता असते. त्या वाहतुकीसाठी मजबूत बनतात. या पिशव्या वापरण्यासाठी अगदी सहज उपलब्ध आहेत, तसेच विविध रंगांमध्ये त्यांचे उत्पादन करण्यास सक्षम असल्याने अनेक कंपन्या आणि व्यापारी या पिशव्यांना प्राधान्य देतात.
त्यांची क्षमता जास्त असल्याने व्यापारी आणि रासायनिक पदार्थांचे उत्पादक त्यांचा माल या पिशव्यांमध्येच वेष्टनबंद करतात. या गोण्या तागाच्या पोत्यांपेक्षा थंड हवेत जास्त सुरक्षित असतात. या प्लास्टिकच्या पिशव्या अतिशय हलक्या आणि वापरण्यास सुलभ आहेत. आज या पिशव्यांना जास्त मागणी आहे.
बाराही महिने बाजारपेठेत मागणी असल्याने या पोत्यांचा प्रकल्प ज्यूटच्या पोत्यांच्या तुलनेत सुरक्षित आणि फायदेशीर आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आजही भारताची सत्तर टक्के लोकसंख्या खेड्यात राहते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने खत उत्पादक कंपन्या त्यांच्या मालाचे पॅकिंग, वाहतूक आणि साठवणुकीसाठी फक्त प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात.
यासोबतच भारतीयांच्या राहणीमानात सुधारणा झाल्यामुळे आणि आधुनिकीकरणामुळे सर्वत्र उंच इमारती दिसू लागल्या. धरणाच्या सर्व कामांसाठी सिमेंट आवश्यक आहे. भारतात सिमेंटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते; त्यासाठीही या गोण्यांचा वापर केला जातो. या सोबतच मोठे आणि छोटे व्यापारी देखील त्यांच्या मालाच्या पॅकिंगसाठी या गोण्यांचा वापर करतात. या व्यवसायासाठी उच्च घनतेचे पॉलीइथिलीन, रासायनिक रंग इत्यादींचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. कटिंग मशिन, प्रिंटिंग मशिन, वर्तुळाकार टेस्टिंग मशिन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, कटर, बाइंडर, इलेक्ट्रिक साहित्य आदी यंत्रसामग्री आवश्यक असते.