
नवी दिल्ली येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 – 26 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीने ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. आयोगाच्या उत्पादनांची विक्री तब्बल एक लाख सत्याऐंशी हजार एकशे पाच कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही आजवरची सर्वाधिक विक्री ठरली आहे. याआधी आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये ही विक्री एक लाख सत्तर हजार पाचशे एकावन्न कोटी रुपये इतकी होती, तर २०१३ –१४ या आर्थिक वर्षात विक्री केवळ एकतीस हजार एकशे चौपन्न कोटी रुपये होती.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आयोगाच्या उत्पादनांची मागणी देशभर झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील कारागीर, महिला बचत गट आणि लघुउद्योग यांना या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी आर्थिक वर्ष २०२६ – २७ मध्ये आयोगाच्या उत्पादनांची विक्री दोन लाख एकावन्न हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल.
आयोगाच्या माहितीनुसार, २०१३ १४ या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादन सव्वीस हजार एकशे नऊ कोटी रुपये इतके होते. त्यामध्ये तब्बल तीनशे ऐंशी टक्क्यांची वाढ होत आर्थिक वर्ष २०२५ – २६ मध्ये हे उत्पादन एक लाख पंचवीस हजार दोनशे शहाण्णव कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आयोगाने ग्रामीण भागात उद्योगवाढीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे उत्पादनात सातत्याने वाढ होत असल्याचेही सांगण्यात आले.
रोजगार निर्मितीच्या बाबतीतही आयोगाने मोठी प्रगती साधल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१३ – १४ मध्ये खादी आणि ग्रामोद्योगाशी संबंधित रोजगारांची एकूण संख्या एक कोटी तीस लाख इतकी होती. ती आता वाढून दोन कोटी चार लाखांवर पोहोचली असून, त्यात छप्पन्न टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीत खादी आणि ग्रामोद्योग आयोग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आर्थिक वर्ष २०२५ – २६ मध्ये तब्बल सहासष्ट हजार चारशे चौर्याण्णव नवीन उद्योग सुरू करण्यात आले. या उद्योगांसाठी दोन हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, सात हजार तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे सात लाख एकतीस हजार चारशे चौतीस नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याची माहिती आयोगाने दिली.