मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा

अलीकडे मुलांची विद्युत उपकरणांशी जवळीक वाढली आहे. कुटुंबात रमणे, नातेवाईकांशी वेळ घालविणे, संवाद साधणे या गोष्टी अभावाने दिसू लागल्या आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही हे सर्व मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. आपल्या दिवसातील अनेक तास मुले स्क्रीनकडे बघत घालवतात. मुले फोन आणि लॅपटॉप पाहण्यात बराच वेळ घालवतात. केवळ मनोरंजनच नाही तर अभ्यास, खेळ या सर्व गोष्टी या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर होतात. पण, मुलाच्या आरोग्यासाठी एवढा स्क्रीन वेळ चांगला आहे का? याबाबत आई-वडिलांनी सतर्क असणे गरजेचे आहे. अलीकडेच काही अभ्यासांचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की, स्क्रीनचा अतिप्रमाणातील वापर आणि मुलांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीचा खोलवर संबंध आहे.

मुलांनी स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यामुळे त्यांच्या मेंदूचे कार्य बिघडते. त्याचा विकासावर परिणाम होतो. अभ्यासानंतर जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे मुलांचा विकास योग्यरित्या होत नाही. या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, लहान मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करण्याची गरज आहे, परंतु आजच्या काळात ते खूप कठीण आहे. ज्याच्या मदतीने आपण मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करू शकतो, अशा उपायांचा अवलंब केला पाहिजे. जेवताना मुलांना फोन किंवा टीव्ही पाहू देऊ नका. जेवताना मन विचलित होऊन उपयोगाचे नाही. त्यामुळे त्यांना यावेळी फोन, टॅब इत्यादी वापरू देऊ नका. एकत्र बसून जेवण्याचा किंवा मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना कंटाळा येणार नाही. अधूनमधून सुट्टीच्या दिवसात बाहेर फिरायला जा. नातेवाईकांकडे जा. स्नेहसंमेलनात सहभागी व्हा. मुलांना नवनव्या गोष्टी दाखवा.

फोन, टॅबलेट, लॅपटॉप इत्यादी साधने बेडरूमच्या बाहेर ठेवा. या गोष्टी झोपेच्या ठिकाणी ठेवल्याने मुलांचे लक्ष पुन्हा-पुन्हा आकर्षित होईल. तसेच, मुलांना झोपेच्या एक तास आधी फोन इत्यादी वापरू देऊ नका. मुलांना व्हिडिओ गेम खेळण्यास देण्याऐवजी बाहेर जाऊन खेळण्यास प्रोत्साहित करा. यामुळे मुलांचा स्क्रीन वेळ कमी होईल. शारीरिक हालचाली केल्याने त्यांचे आरोग्यही सुधारेल. याव्यतिरिक्त कोडी, बोर्ड गेम इत्यादींसारखे खेळ आपण खेळू शकता. अन्यथा मुले एकलकोंडी होऊ शकतात.