
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या एका थरारक आणि तितक्याच भावनिक वळणावर येऊन ठेपली आहे. १७ आणि १८ एप्रिलच्या भागात मालिकेत एक असे धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे ज्यामुळे सुभेदार कुटुंबाचे संपूर्ण आयुष्यच विस्कळीत होणार आहे. मालिकेतील खलनायिका प्रियाने आता आपल्या पापांचा घडा भरल्याचे संकेत दिले असून तिने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून स्वतःच्या मावशीचाच अंत केला आहे. मात्र हा केवळ हत्येचा गुन्हा नसून त्यामागे अर्जुनला उद्ध्वस्त करण्याचा एक मोठा कुटील डाव दडलेला आहे.
मालिकेच्या या विशेष भागांमध्ये प्रेक्षक पाहणार आहेत की प्रियाने अत्यंत थंड डोक्याने शांता मावशीचा काटा काढला आहे. तिच्या विरोधातले सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी तिने हे टोकाचे पाऊल उचलले असले तरी तिचा मूळ उद्देश अर्जुन सुभेदारला यात गोवणे हा आहे. प्रियाने घटनास्थळी अशा काही खुणा आणि पुरावे रचले आहेत ज्यामुळे पोलिसांचा संशय थेट अर्जुनवर वळतो. निष्पाप अर्जुनला हत्येच्या आरोपाखाली पोलिसांच्या बेड्या पडताना पाहून सुभेदार कुटुंबासह सर्व प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसणार आहे. स्वतःच्या कृत्यावर पश्चात्ताप करण्याऐवजी प्रिया आपल्या या मास्टरमाईंड डावावर गर्व करत असून तिचे हे रूप आता समोर आले आहे.
अर्जुनच्या अटकेमुळे सायलीच्या आयुष्यात एक मोठे वादळ निर्माण झाले आहे. ज्या अर्जुनने प्रत्येक संकटात सायलीला सावली दिली तोच आज खोट्या आरोपाखाली तुरुंगाच्या गजाआड गेल्यामुळे सायलीची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. मात्र,याच कठीण प्रसंगात सायलीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खंबीर पैलू समोर येणार आहे. पतीवर ओढवलेले हे संकट पाहून सायली कोलमडून न पडता त्याच्यासाठी ढाल बनून उभी राहणार आहे. इथूनच सायलीच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. तिला ठाऊक आहे की अर्जुन निर्दोष आहे पण हे सिद्ध करण्यासाठी तिला आता कायद्याच्या आणि सत्याच्या कसोटीवर उतरावे लागणार आहे.सायलीचा हा लढा अत्यंत खडतर असणार आहे शांता मावशीच्या मृत्यूचे गूढ उकलणे आणि प्रियाने पेरलेले खोटे पुरावे खोडून काढणे हे सायलीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या संघर्षात तिला सुभेदार कुटुंबालाही मानसिक आधार द्यायचा आहे.
प्रेक्षकांसाठी हे आगामी भाग अत्यंत उत्कंठावर्धक असणार आहेत कारण. अर्जुनला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी सायली आता या कायदेशीर लढाईत कशी बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेचे हे नवीन वळण सायली आणि अर्जुनच्या नात्याची परीक्षा घेणारे असून सायलीचा हा संघर्ष प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवणार हे नक्की.