
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा तीव्र झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नव्या इशाऱ्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली आहे. सामाजिक माध्यमावरील संदेशात ट्रम्प यांनी “वेळ संपत चालली आहे” असे म्हणत इराणला तातडीने करारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पश्चिम आशियातील अनेक महिन्यांच्या अस्थिरतेनंतर अणुकार्यक्रम, आर्थिक निर्बंध आणि युद्धभरपाईच्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांतील चर्चा ठप्प झाली आहे.
अमेरिकेच्या अटींवरून वाद तीव्र
इराणी माध्यमांनुसार, चर्चेची पुनर्रचना करण्यासाठी अमेरिकेने काही कठोर अटी मांडल्या आहेत. त्यानुसार इराणने सुमारे चारशे किलोग्रॅम समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करावे, फक्त एकच अणुकेंद्र कार्यरत ठेवावे आणि युद्धभरपाईची मागणी मागे घ्यावी, अशी भूमिका वॉशिंग्टनने घेतली आहे. याशिवाय गोठवलेली बहुतांश इराणी मालमत्ता मुक्त केली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रादेशिक संघर्षांबाबत कोणतीही शिथिलता चर्चेनंतरच दिली जाईल, अशी अमेरिकेची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
इराणनेही ठेवल्या स्वतःच्या अटी
अमेरिकेच्या अटी इराणने फेटाळून लावत स्वतःच्या मागण्या पुढे केल्या आहेत. लेबनॉनसह पश्चिम आशियातील लष्करी कारवाया थांबवाव्यात, सर्व आर्थिक निर्बंध हटवावेत आणि गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करावी, अशी मागणी तेहरानने केली आहे. तसेच युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण मान्य करण्याची अटही इराणने मांडली आहे.
हॉर्मुझ सामुद्रधुनी बनली संघर्षाचा केंद्रबिंदू
हॉर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या परिसरात इराणने जहाजवाहतुकीवरील नियंत्रण अधिक कडक केले असून, अमेरिकेने नौदल हालचाली आणि आर्थिक निर्बंधांद्वारे दबाव वाढवला आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, कच्च्या तेलाच्या किमतींवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे.
राजनैतिक प्रयत्न ठप्पच
यंदाच्या सुरुवातीला युद्धविराम झाला असला तरी दीर्घकालीन राजकीय तोडगा अद्याप निघालेला नाही. गेल्या आठवड्यात दोन्ही देशांनी एकमेकांचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर राजनैतिक प्रयत्न जवळपास थांबले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, जागतिक समुदायाकडून संयम आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचे आवाहन केले जात आहे.