
ओल्या काजूचे दिवस सुरु आहेत. गावांमध्ये गेल्यावर झाडावर लगडलेले काजू वाऱ्यावर डोलताना दिसतात. अर्थात, बाजारातही ते उपलब्ध आहेत. ओले काजू स्वादिष्ट असतात. आज बनवूया, ओल्या काजूची भाजी.
साहित्य : पाव किलो सोललेले ओले काजूगर, २ कांदे, २ बटाटे, १ टोमॅटो, अर्धा ओला नारळ किसून, लसुण, आले, गरम मसाला पावडर, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि तेल.
कृती : ओले काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून त्यांचे तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, एक बारीक चिरलेला कांदा, लसुण व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. हे मिश्रण चांगले परतवून घ्यावे. छान मऊ शिजल्यावर त्यात सोललेले काजू आणि बटाट्याचे तुकडे घालावेत. त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.
आता बारीक उभा चिरलेला कांदा तेलात भाजून घ्यावा. तो लालसर झाला की त्यात ओले खोबरे घालून खरपूस भाजून घ्यावे. या भाजलेल्या कांदा- खोबऱ्याचे मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटण करुन घ्यावे. कढईतील बटाटा, काजू शिजले की त्यात हे मिश्रण घालून मिसळून घ्यावे. एक मस्त वाफ आणावी. यावेळी त्यात गरम मसाला पावडर घालावी. उतरताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.