बांबूच्या कलाकृतींचा उद्योग
बांबूवर आधारित वस्तूंचा वापर अलीकडे वाढू लागला आहे. घराच्या सजावटीकडे नवीन पिढी बारकाईने लक्ष देत असते. सजावटीमध्ये त्यांचा वापर केला जातो. या वस्तू नाजूक आणि आकर्षक दिसत असल्याने तसेच पर्यावरणपूरक असल्याने लोकांची याला पसंती मिळत आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार ही उत्पादने घेतली जातात. बांबूपासून सुमारे 15 प्रकारचे आकाशकंदील, पन्नास प्रकारच्या फुलदाण्या, दहा प्रकारच्या दागिनेपेट्या तयार केल्या जातात. या कलाकृती तयार करण्यासाठी बहुला, बिजली, मकल, कळक, मेसकाठी, टल्ला आदी प्रकारच्या बांबूंचा वापर केला जातो.
फुलदाण्या, पेन स्टॅंड, दागिनेपेटी, पक्ष्यांचे घर, भोजनासाठीच्या टेबल-खुर्च्या, आरामखुर्च्या, सोफा सेट, पलंगड, चटई, पडदे, फळे ठेवण्यासाठी पात्रे, टोप्या, आकाशदिवे, झुले, इ. प्रकारच्या अनेक आकर्षक वस्तू बांबूपासून बनविल्या जातात. या वस्तूंमध्ये छान प्रकारची कलाकुसर असते. अनेक कारागीर असे उत्पादन घेऊन चांगला नफा कमवितात. पूर्वी हा एक बलुतेदारीचा व्यवसाय होता. आता त्याकडे सजावटीच्या दृष्टीकोनातून आणि पर्यावरणपूरक म्हणून पहिले जाते. हा व्यवसाय करायचा झाल्यास आधी त्या वस्तू कशा बनवितात, हे शिकून घ्यावे. बांबूंची खरेदी शक्यतो शेतकऱ्यांकडून करावी. बांबूचे आकार व लांबीनुसार दर असतात. आवश्यकतेनुसार उत्पादने घेत असल्याने तेवढ्याच कच्च्या मालाची खरेदी करावी.
बांबूवर प्रक्रिया करणे हे कष्टाचे काम असते. बांबू तोडणी करून त्यानंतर बांबूवरील गाठी काढून घेतल्या जातात. त्याला पॉलिश करून आपणास हवे तसे विविध आकार दिले जातात. बांबूला कीड-रोग लागू नये यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया केली जाते. पॉलिश किंवा गरजेनुसार रंग दिला जातो. बांबूच्या चिवा फोडून पट्ट्या तयार केल्या जातात. ‘कळक’ प्रकरच्या बांबूपासून विविध क्षेत्रफळांचे पलंग तयार करतात. लग्नसराईत रुखवतात सजावटीसाठी बांबूच्या विविध वस्तूंचा वापर होतो. दीपावलीच्या काळात आकाशकंदिलांना मागणी असल्याने आकाशकंदील तयार केले जातात.
विश्रामगृहे,तंबू, कृषी हाऊस, पर्णकुटी, रिसॉर्ट, पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, आदींकडूनही सजावटीसाठी या उत्पादनांना मागणी असते. अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध प्रदर्शनांमध्ये ते विक्रीस ठेवल्यास त्याचा लाभ होतो. महानगरे तसेच शहरातील मॉल्स, मोठे स्टोअर्स येथे बांबूची उत्पादने विकणे योग्य ठरते. या उद्योगात सातत्य ठेवल्यास, त्यात झोकून देत काम केल्यास लाखो रूपयांची उलाढाल होते, असे यामध्ये तरबेज असलेले कारागीर सांगतात. त्यात मागणीनुसार चढ-उतार राहतात.
दरम्यान, या उद्योगात संयम राखणेसुद्धा फार महत्त्वाचे असते. बांबूच्या उत्पादनांना लाकडी वस्तूंच्या तुलनेत ग्राहकांकडून त्वरित पसंती मिळणे कठीण असते. ग्राहकांना आपल्या उत्पादनाचे महत्त्व चांगल्या प्रकारे पटवून द्यावे लागते. या उत्पादनांच्या किमतीही सर्वसामान्य ग्राहकांना महाग वाटतात. बांबूची उत्पादने दीर्घकाळ टिकतील का, याबाबत ग्राहक साशंक असतात. कारागीरांच्या अनुभवानुसार बांबूच्या वस्तू पंधरा वर्षे टिकतात. जंगलतोडीच्या आजच्या युगात बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर आहेत. बांबूचे महत्त्व व्यवसायाच्या माध्यमातून वाढविणे शक्य आहे.