मुगाची शेती
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानात जोमाने वाढणाऱ्या मुगाची लागवड शेतकरी करतात. मागील काही वर्षांमध्ये मुगाला चांगले दर मिळू लागले आहेत. पावसाळ्याबरोबरच उन्हाळ्यातही चांगली सिंचन व्यवस्था असल्यास मुगाची शेती करता येते. मूग पीक ६० ते ६५ दिवसांत पक्व होते. या काळात पाणी नियमित द्यावे लागते.
उन्हाळी शेती करण्याचा विचार असल्यास मुगाकरिता ‘पूसा वैशाखी’, ‘वैभव’ या जातींची शिफारस केलेली आहे. या शेतीसाठी पाण्याच्या उत्तम निचऱ्याची मध्यम ते भारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारयुक्त तसेच निकृष्ट जमिनीत मुगाची लागवड करू नये. अशा जमिनीत मुळावर ‘रायझोबीयम’ जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होतो.
फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात उन्हाळी मुगाची पेरणी करावी. मूग पेरताना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी. आणि दोन रोपांतील १० सेंमी. ठेवावे.
मुगाला मशागतीची फारशी आवश्यकता नसते. जमीन भुसभुसीत करावी. एकरी ५ ते ६ किलो बियाणे लागते. घरगुती बियाणे असल्यास दर तीन वर्षांनी ते बदलावे. आपले शेत नेहमी तणमुक्त ठेवावे. मानवी आहाराच्या दृष्टीने मुगास विशेष महत्त्व आहे. मुगामध्ये २० ते २५ टक्के प्रथिने असतात. ही प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे.
शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप आणि उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे पीक आहे.