चिनीमातीच्या भांड्यांचा उद्योग
चिनीमातीची भांडी बनविण्याचा उद्योग फार जुना आहे. भारतातील ठराविकच भागात तो चालतो. दिल्लीजवळ असणारे ‘खुर्जा’ गाव या उद्योगासाठी नावाजलेले आहे. चिनीमातीची भांडी ही चीनची निर्मिती आहे. चीनच्या दक्षिणेकडील ‘चेच्यांग’ प्रांतात ही माती मिळायची. मुळात, चिनीमाती हे ‘काओलिनाइट’ याप्रकारचे एक औद्योगिक खनिज असून हे चीनमध्ये सापडते, म्हणून त्यास ‘चिनीमाती’ असे म्हणतात.
या मातीत फुगण्याची व आक्रसण्याची क्षमता फारच कमी असते. याचा वापर भांडी बनविण्यासाठी,औषधासाठी व टूथपेस्टमध्ये करतात. महाराष्ट्रातही रत्ना्गिरी, कोल्हापूर जिल्ह्यात ही माती (खनिज) सापडते. ही भांडी बनविण्यासाठी साधारणपणे पन्नास टक्के हाडांचा भुगा, पंचवीस टक्के चिनी माती, पंचवीस टक्के चिनी दगडांचा भुगा आणि रसायनांचा वापर केला जातो.
आजपासून तब्बल 2 हजार वर्षांपूर्वीपासून चिनीमातीची भांडी वापरात आहेत. सुरुवातीला भारतातून चिनीमातीची भांडी आशियात निर्यात केली जात होती. पुढे पोर्तुगालने नवीन समुद्री मार्ग शोधल्यावर ही भांडी युरोपातसुद्धा जायला लागली. इ.स.सतराव्याव्या शतकात युरोपातील अनेक राजमहाल चिनीमातीच्या भांड्यांनी सजलेले दिसू लागले. पुढे अल्पावधीत ही भांडी युरोपात प्रचंड लोकप्रिय झाली. इ.स.च्या अठराव्या शतकात जवळपास दहा लाख भांड्यांची निर्यात चीन करू लागला होता.
चीनवरून येणारी भांडी म्हणून साहजिकच त्यांना चिनीमातीची भांडी हे नाव पडून पुढे तेच रूढ झाले.भारतातही चिनी माती मुबलक प्रमाणात मिळते. बिहारमधील राजमहाल टेकड्या, ‘पथरपट्टा’ नावाचे ठिकाण, दिल्लीजवळील काही टेकड्या तसेच केरळमधील त्रिवेंद्रमजवळ उत्तम प्रतीची चिनी माती सापडते. राजस्थान, आंध्रप्रदेश, आसाम, पंजाब, महाराष्ट्रातही ती आढळते.
दिल्लीपासून नव्वद किलोमीटरवर उत्तर प्रदेशात असणारे ‘खुर्जा’ हे लहानसे शहर या भांड्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात अनेक प्रकारची चिनीमातीची भांडी तयार केली जातात. त्यावर आकर्षक सजावट केली जाते. भारतातील या शहरात चिनीमातीच्या भांड्यांचा उद्योग चालतो. अशा प्रकारचे भांडी बनविण्याचे ‘खुर्जा’ हे सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक असल्याचा उल्लेख तत्कालिन लेखनांमध्ये आढळतो.
येथील कारागीर स्वतःला ‘मुलतानी कुंभार’ म्हणवतात. भारतातील सध्याचा भांडी बनविण्याचा व्यवसाय हा इ.स. 1940 च्या दशकात बहरला. उत्तर प्रदेश सरकारने इ.स. 1942 साली कारखाना उभा केला; पण तो उत्तम गुणवत्ता साधता न आल्याने इ.स. 1947 साली बंद पडला. इ.स. 1952 साली त्याच जागेवर या भांड्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र उभे केले गेले. तेव्हापासून आजवर अनेक प्रकारचे प्रयोग येथे करण्यात येत आहेत. त्यामुळेच ‘खुर्जा’ देशात तसेच जगात चिनीमातीची भांडी निर्यात करणारे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित झाले आहे.