
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने समाज माध्यमांवर फिरत असलेल्या काही बनावट चित्रफितींबाबत प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना सतर्क केले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले हे डीपफेक किंवा फेरफार केलेले व्हिडिओ नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध समाज माध्यमांवर काही चित्रफिती प्रसारित होत आहेत. या चित्रफितींमध्ये असा दावा केला जात आहे की, दुबई विमानतळावर जप्त केलेले प्रवाशांचे सामान अत्यंत कमी किमतीत विकले जात आहे. काही चित्रफितींमध्ये तर विमानतळ प्रशासनाच्या नावाचा आणि लोगोचा अनधिकृत वापर करून ‘लकी ड्रॉ’ किंवा ‘सेल’च्या जाहिराती दिल्या जात आहेत. हे व्हिडिओ इतक्या सफाईदारपणे बनवले आहेत की, ते खरे वाटावेत, परंतु विमानतळ प्राधिकरणाने हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
दुबई विमानतळ प्रवक्त्याने अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. विमानतळ प्रशासन जप्त केलेले सामान किंवा हरवलेले सामान कधीही समाज माध्यमांच्या माध्यमातून विकत नाही. ज्या चित्रफिती इंटरनेटवर फिरत आहेत, ते पूर्णपणे बनावट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले आहेत. या चित्रफितींशी दुबई विमानतळाचा कोणताही संबंध नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या चित्रफितींमागे सायबर गुन्हेगारांची मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. हे गुन्हेगार लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुबई विमानतळासारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या नावाचा वापर करतात. चित्रफितींमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्त्यांना एका बनावट संकेतस्थळावर नेले जाते. तिथे स्वस्त सामानाचे आमिष दाखवून लोकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती आणि क्रेडिट – डेबिट कार्डचे तपशील भरून घेतले जातात. एकदा का कार्डचे तपशील मिळाले की, लोकांच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले जातात.
दुबई विमानतळाने प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विमानतळाशी संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ किंवा त्यांच्या अधिकृत समाज माध्यम हँडल्सचा वापर करा. अत्यंत कमी किमतीत ब्रँडेड वस्तू किंवा सामान मिळत असल्याचे दावे करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहा. अनोळखी लिंकवर क्लिक करून आपली बँक खात्याची माहिती किंवा पासवर्ड कधीही देऊ नका. अशा बनावट चित्रफिती आढळल्यास संबंधित समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर त्याची तक्रार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.