इयत्ता चौथी – सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ
इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनेक शाळांना तांत्रिक अडचणींमुळे आणि नवीन नियमांमुळे विहित मुदतीत विद्यार्थ्यांची नोंदणी करता आली नव्हती. ही बाब गांभीर्याने घेत परीक्षा परिषदेने अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता दहा मार्च २०२६ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहेत.
परिषदेने स्पष्ट केले आहे की, दहा मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यंदापासून शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेत महत्त्वाचा बदल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून केवळ पाचवी आणि आठवीसाठी होणारी ही परीक्षा आता पुन्हा एकदा इयत्ता चौथी आणि सातवी साठी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांचा पाया प्राथमिक स्तरावरच मजबूत व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यंदा ही परीक्षा एप्रिल महिन्यात नियोजित असल्याने उन्हाचा तडाखा आणि वार्षिक परीक्षांचे नियोजन लक्षात घेता काही पालक संघटनांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याचीही मागणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळांना अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची नोंदणी करावी लागते. १ जून २०२५ रोजी चौथीच्या विद्यार्थ्याचे वय दहा वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर सातवीच्या विद्यार्थ्याचे वय तेरा वर्षांपेक्षा जास्त नसावे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वयात चार वर्षांची सवलत आहे. विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते तपशील आणि फोटो – स्वाक्षरी डिजिटल स्वरूपात असणे अनिवार्य आहे.
राज्यातील अनेक शाळांनी अद्याप नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. कमी नोंदणी झाल्यामुळे परिषदेने शाळांना ‘तंबि’ही दिली आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा, यासाठी मुख्याध्यापकांनी स्वतः लक्ष देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.