शहरी भारतीयांच्या रक्तात कीटकनाशकांचे अंश –  आरोग्य संस्थेचा अहवाल

भारतातील शहरी लोकसंख्येबाबत केलेल्या एका नवीन अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशोधनानुसार, शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे अठ्ठ्याहत्तर टक्के लोकांच्या रक्तात कीटकनाशकांचे अंश आढळले आहेत. बंगळुरूमधील गट हेल्थ स्टार्टअप मायक्रोबायोटेक  या आरोग्य संस्थेने विविध शहरांतील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासून हा निष्कर्ष काढला आहे. शरीरातील या विषारी घटकांमुळे भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

या सखोल संशोधनासाठी देशातील वेगवेगळ्या शहरांमधून दोनशे लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले होते. या तपासणीमध्ये प्रामुख्याने कीटकनाशके, प्रतिजैविके, स्टिरॉइड प्रकारची औषधे आणि निसर्गात दीर्घकाळ टिकणारी कृत्रिम रसायने अशा घातक घटकांचा शोध घेण्यात आला. चाचणीअंती असे दिसून आले की, बहुतांश नागरिकांच्या शरीरात विविध प्रकारच्या रासायनिक अंशांचा साठा झाला असून, हे घटक नकळतपणे मानवी आरोग्याला पोखरत आहेत.

अभ्यासातील आकडेवारीनुसार, अठ्ठ्याहत्तर टक्के लोकांच्या रक्तात कीटकनाशके सापडली असून, छत्तीस टक्के लोकांमध्ये तर तीन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारची कीटकनाशके आढळून आली आहेत. हे विषारी अंश प्रामुख्याने दूषित अन्नपदार्थ, प्लास्टिकचा अतिवापर, भूजल आणि पर्यावरणातील वाढते प्रदूषण यांमुळे शरीरात प्रवेश करतात. एकापेक्षा जास्त रसायनांचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊन भविष्यात दुर्धर आजार जडण्याची शक्यता संशोधकांनी या निमित्ताने वर्तवली आहे.

कीटकनाशकांव्यतिरिक्त, चोपन्न टक्के लोकांच्या नमुन्यांमध्ये प्रतिजैविकांचे अंश सापडले आहेत, ज्यामुळे भविष्यात औषधांना दाद न देणारे जंतू तयार होऊन संसर्गावर उपचार करणे कठीण होऊ शकते. तसेच, एकोणचाळीस टक्के लोकांच्या रक्तात स्टिरॉइड प्रकारची संयुगे आढळली असून, ती शरीरातील संप्रेरक प्रणालीमध्ये मोठा बिघाड घडवू शकतात. या रसायनांचा मानवी चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी अडतीस टक्के लोकांमध्ये दीर्घकाळ टिकणारी कृत्रिम रसायने आढळून आली आहेत, जी कर्करोग, वंध्यत्व, थायरॉईडचे विकार आणि यकृताच्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात. विशेष चिंतेची बाब म्हणजे, सतरा टक्के नमुन्यांमध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त विषारी घटक एकत्र आढळले आहेत. ही आकडेवारी शहरी भागातील नागरिकांचा रसायनांशी येत असलेला छुप्या संपर्काची व्याप्ती किती भयानक आहे, हे अधोरेखित करते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,925 वेळा पाहिलं