पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रायसिना डायलॉग २०२६ चे उद्घाटन

आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायसिना डायलॉगचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या तीन दिवसीय परिषदेत जगातील दिग्गज नेते, परराष्ट्र धोरण तज्ज्ञ एकत्र येऊन विविध जागतिक समस्यांवर चर्चा करणार आहेत. हे संमेलन पाच ते सात मार्च दरम्यान संपन्न होईल.

यंदाच्या परिषदेचे मुख्य पाहुणे म्हणून फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब उपस्थित असून ते उद्घाटनाच्या सत्रात भाषण करणार आहेत. याव्यतिरिक्त, एकशे दहा हून अधिक देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. यामध्ये विविध देशांचे परराष्ट्र मंत्री आणि माजी राष्ट्रप्रमुख, लष्करी कमांडर आणि धोरणकर्ते, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि उद्योगपती, प्रसिद्ध विचारवंत आणि पत्रकार सहभागी आहेत. यंदाची चर्चा प्रामुख्याने खालील सहा विषयांवर केंद्रित असेल. सत्तासंघर्ष आणि जागतिक ध्रुवीकरण, महासागर, सायबर अवकाश आणि जागतिक संसाधनांचे रक्षण, शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठीचा पाठपुरावा, हवामान बदल, युद्ध आणि संघर्षाचे मानवी मूल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातील आव्हाने, जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीतील लवचिकता या विषयांवर चर्चा आधारित असेल.

या परिषदेच्या माध्यमातून भारत स्वतःला जागतिक विकसशील आणि विकसित अर्थव्यवस्थांमधील सेतू म्हणून सादर करत आहे. भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेलची चर्चा यावेळी प्रामुख्याने होईल. तसेच, भारताच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या रोडमॅपवरही जागतिक नेत्यांशी संवाद साधला जाईल. पुढील तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेतून निघणारे निष्कर्ष जागतिक शांतता, व्यापार आणि तंत्रज्ञान सुरक्षेसाठी अत्यंत दिशादर्शक ठरतील.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
9,037 वेळा पाहिलं