भारतातून कर्करोगाचे समूळ उच्चाटन करणार – स्वदेशी लसीला प्राधान्य

भारताचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी गर्भाशयाचा कर्करोग देशातून पूर्णपणे नष्ट करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित एका उच्चस्तरीय कार्यक्रमात बोलताना त्यांनी या आजाराविरुद्धच्या लढ्यासाठी भारताने आखलेल्या धोरणात्मक आराखड्याची माहिती दिली.

गर्भाशय मुखाचा कर्करोगाचा आजार, हा प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. केंद्र सरकार नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण मोहिमेवर विशेष भर देत आहे. या लसीकरण मोहिमेला राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा भाग बनवण्यासाठी सरकार वेगाने पावले उचलत आहे. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींनाही संरक्षण मिळेल, असे मत जे. पी. नड्डा यांनी मांडले. आरोग्य मंत्र्यांनी नमूद केले की, भारतात कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ लसीकरण पुरेसे नाही, तर नियमित तपासणी देखील तितकीच महत्त्वाची आहे. आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या माध्यमातून तीस वर्षांवरील महिलांची प्राथमिक तपासणी विनामूल्य केली जात आहे. जेवढ्या लवकर आजाराचे निदान होईल, तेवढी उपचाराची यशस्वीता जास्त असते, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

भारताने स्वतःची स्वदेशी बनावटीची लस विकसित केली आहे. स्वदेशी लसीमुळे लसीकरणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून ती सर्वसामान्यांना परवडणारी ठरत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत या लसीचे उत्पादन वाढवून केवळ भारताची गरज भागवणे नव्हे, तर इतर विकसनशील देशांनाही मदत करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, असे नड्डा यांनी सांगितले.  जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत गर्भाशय मुखाचा कर्करोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  नड्डा यांनी सांगितले की, भारत या जागतिक उद्दिष्टांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. तसेच, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने समाजात या आजाराबद्दल असलेली भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शेवटी, नड्डा यांनी आवाहन केले की, हा लढा केवळ सरकारचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. महिलांचे आरोग्य हे कुटुंबाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे आरोग्य आहे, त्यामुळे प्रत्येक पात्र मुलीने लसीकरण करून घेणे आणि महिलांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,049 वेळा पाहिलं