सौदी अरेबियातील अमेरिकेच्या नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दूतावासाने तेथील आपल्या नागरिकांसाठी तातडीचा सुरक्षा इशारा जारी केला आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत अस्थिर होत असल्याने, अमेरिकन नागरिकांनी उपलब्ध विमानांद्वारे शक्य तितक्या लवकर सौदी अरेबिया सोडवा, असे या सूचनेत म्हटले आहे. हा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि अमेरिकेचा परराष्ट्र विभाग यांच्या ‘नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य’ देण्याच्या धोरणाचा एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या रियाध, जेद्दा आणि धहरान या शहरांमधून काही व्यावसायिक विमानसेवा कार्यान्वित आहेत. मात्र, अनेक विमान फेऱ्या रद्द होत असून उड्डाणांना मोठा विलंब होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडण्यापूर्वी आणि विमानसेवा उपलब्ध असेपर्यंत सुरक्षित मार्गाचा अवलंब करून अमेरिकन नागरिकांनी तातडीने देश सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तणावामुळे कोणत्याही क्षणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर ही महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर संपूर्ण प्रदेशात युद्धाची ठिणगी पडली आहे. या कारवाईनंतर विविध देशांमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले होण्याचा धोका वाढला आहे. याच धोक्याची दखल घेऊन अमेरिकन दूतावासांनी अनेक देशांतील आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियमावली आणि सूचना जारी केल्या आहेत.

या भीषण संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले असून हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही देशांनी तर आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. युद्धाच्या या ढगांमुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सध्या अत्यंत जटील आणि जोखमीचा बनला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांना आवश्यक मदतीसाठी विशेष दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. परिस्थिती प्रत्येक क्षणाला बदलत असल्याने नागरिकांनी अधिकृत सरकारी सूचनांकडे बारीक लक्ष ठेवावे आणि सावधगिरी बाळगावी, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेतील या वाढत्या संघर्षाचे पडसाद येत्या काही दिवसांत अधिक गंभीर होण्याची शक्यता संरक्षण विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,837 वेळा पाहिलं