
मुंबईत सध्या गॅस तुटवड्याचे संकट गडद झाले आहे. याचा परिणाम मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर झाला आहे. इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील अनेक भागांतील हॉटेल्सना नाईलाजास्तव आपले कामकाज बंद ठेवावे लागत आहे. तर काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात सेवा दिली जात आहे. या संकटामुळे ऐन गर्दीच्या काळात खवय्यांची निराशा होत असून हॉटेल मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मुंबईला पुरवठा होणाऱ्या लिक्विफाइड नॅशनल गॅस आणि पीएनजी पुरवठ्यात अचानक व्यत्यय आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गॅसचा साठा मर्यादित झाल्याच्या तक्रारी व्यावसायिक ग्राहकांकडून केल्या जात होत्या. विशेषतः मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये इंधन पोहोचत नसल्याने गॅस शेगड्या पेटणे कठीण झाले आहे. इंधन नसल्यामुळे अनेक मध्यम आणि छोट्या रेस्टॉरंट्सनी नो सर्व्हिसचे बोर्ड लावले आहेत. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी गॅस उपलब्ध नसल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ज्या हॉटेल्सकडे थोडाफार गॅस शिल्लक आहे, त्यांनी आपला मेनू मर्यादित केला आहे. ज्या पदार्थांना जास्त वेळ गॅस लागतो, ते पदार्थ बनवणे बंद करण्यात आले आहे. झोमॅटो आणि स्विगी सारख्या प्लॅटफॉर्मवरून होणारी डिलिव्हरीही विस्कळीत झाली आहे. ऑर्डर स्वीकारून ती वेळेत पूर्ण करणे कठीण जात असल्याने अनेक रेस्टॉरंट्सनी आपले ऑनलाइन अस्तित्व तात्पुरते बंद ठेवले आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आधीच वाढलेले असताना, पाईप्ड नॅशनल गॅस हा हॉटेल मालकांसाठी मोठा आधार होता. मात्र, पुरवठा खंडित झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून महागड्या व्यावसायिक सिलिंडरची मागणी वाढली आहे. मात्र, मागणी अचानक वाढल्याने बाजारात या सिलिंडरचाही तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस पुरवठा अचानक थांबल्याने आमचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे आणि कच्चा माल यांचा खर्च निघणे कठीण झाले आहे. सरकारने तातडीने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे, असे मत एका स्थानिक हॉटेल मालकाने मांडले आहे. लवकरच हा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी, नेमका किती वेळ लागेल याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.