
सोनल प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्रिया बापट यांची प्रस्तुती असलेले ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर अभिनव विषयामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून उतरलेले आणि अद्वैत दादरकर व रणजित पाटील यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक केवळ दोन पात्रांची कथा नसून ती आजच्या काळातील प्रत्येक व्यक्तीची व्यथा मांडणारी गोष्ट आहे. हल्लीच्या पिढीमध्ये ब्रेकअप आणि घटस्फोट या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
अनेकांना या गोष्टी सहज आणि सोप्या वाटू लागल्या आहेत, किंबहुना तसा माईंडसेटच तयार झाला आहे. अशा या गुंतागुंतीच्या काळात प्रिया बापट आणि उमेश कामत ही लाडकी जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र येऊन नात्यांमधील ‘जर-तर’चा हिशोब मांडत आहे.
नाटकाचे कथानक राधा आणि समर या दोन पात्रांभोवती फिरते. प्रेमात पडणे, लग्न करणे आणि दुर्दैवाने घटस्फोटापर्यंत पोहोचणे हा त्यांचा प्रवास असला तरी, कागदावरचे नाते संपल्यावर मनातील ओढ आणि जुन्या सवयी इतक्या लवकर सुटतात का, हा प्रश्न नाटक प्रकर्षाने उपस्थित करते. आयुष्यात एकट्याने जगणे ही निवड असू शकते, पण त्यात खरी गंमत आणण्यासाठी कुणीतरी आपले असावे लागतेच. मात्र, हे करताना स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे विसरून नात्यात वाहून जाणेही धोक्याचे असते. या दोन टोकांमधील सुवर्णमध्य कसा साधावा आणि नाते कसे बहरावे, याचे अत्यंत तरल दर्शन या नाटकातून घडते. “तुझं आणि माझंच्या मध्ये थोडं ‘आपलं’ व्हावं,” ही या नाटकाने मांडलेली सोपी पण खोलवर जाणारी व्याख्या प्रेक्षकांच्या मनाला भिडते.
नाटकामध्ये एक अतिशय मार्मिक संवाद आहे की, “आपला काळच प्रॉब्लेमॅटिक आहे.” ही ओळ आजच्या तरुण पिढीची खरी समस्या अधोरेखित करते. जुन्या पिढीचे नाते टिकवण्याचे मार्ग आजच्या तरुणांना मान्य नाहीत आणि स्वतःचे नवीन मार्ग त्यांना अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे ही पिढी भूतकाळातील ‘जर’ आणि भविष्यातील ‘तर’ यांच्या चक्रात अडकली आहे. केवळ दोन व्यक्तींच्या भेटीत लग्नाचा निर्णय घेणारी आणि अवघ्या दोन वर्षांत विभक्त होणारी माणसे आजच्या वास्तवाचा भाग आहेत. या प्रक्रियेत नात्यातील जादू आणि खरी मजा शोधण्याआधीच हरवून जाते. ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक याच हरवलेल्या संवादाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर प्रिया बापट दीर्घकाळानंतर रंगभूमीवर परतली असून तिने आपला ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. उमेश कामतसोबतची तिची केमिस्ट्री नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांना खिळवून ठेवते. त्यांच्या जोडीला आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय यांच्या भूमिकांनी नाटकाला पूर्णत्व दिले आहे. काही नाती ही घुसमट वाढवणारी असतात, तर काही वेळा केवळ आपल्या माणसाने पूर्ण वेळ आपल्यासाठीच असावे ही अपेक्षा नात्याची वीण विसकटते. ही स्वभाववैशिष्ट्ये आशुतोष आणि पल्लवीच्या पात्रांतून प्रभावीपणे मांडली आहेत. या चौघांचा अभिनय पाहताना प्रेक्षकांना आपण स्वतःच त्या परिस्थितीत आहोत, अशी जाणीव होते.
नाटकाच्या तांत्रिक बाजूबद्दल बोलायचे झाले तर विशेषतः संगीत, अत्यंत प्रभावी आहे. नाटकातील ‘जर-तरचं गाणं’ आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून ते कथेच्या प्रवाहात अधिक भर टाकते. सुरुवातीला प्रोमो पाहून हे नाटक निव्वळ रोमँटिक असेल असे वाटले होते, परंतु प्रत्यक्षात ते आजच्या काळातील नात्यांची वास्तववादी मांडणी करणारे ठरले आहे. म्हणूनच या नाटकाला केवळ तरुणांचाच नव्हे, तर आजी-आजोबा आणि पालकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही कोणत्याही नात्यात असा किंवा एकटे राहण्याचा निर्णय घेतलेला असो, ही गोष्ट प्रत्येकाने एकदा आवर्जून पाहायला हवी. नात्यातील ‘बेसिक’ प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी हे नाटक एक उत्तम अनुभव ठरते.