
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियाला लष्करी सरावावरून थेट इशारा दिला आहे. आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचे अत्यंत भयानक आणि अकल्पनीय परिणाम होतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने फ्रीडम शील्ड नावाचा वार्षिक संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. हा सराव अकरा दिवस चालणार असून यात हजारो सैनिक सहभागी झाले आहेत. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या एकत्रित लढाऊ क्षमतेची चाचणी घेणे आणि युद्धजन्य परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जाता येईल, याचे सराव करणे हा आहे. उत्तर कोरियाने मात्र या सरावाकडे नेहमीप्रमाणेच ‘आक्रमणाची तयारी’ किंवा ‘युद्धाचा सराव’ म्हणून पाहिले आहे. किम यो जोंग यांनी या सरावावर तीव्र आक्षेप घेतला असून, हे कृत्य प्रदेशातील शांततेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. किम यो जोंग यांनी आपल्या निवेदनात जागतिक परिस्थितीचा संदर्भ दिला आहे. त्यांनी म्हटले की, जगाची सुरक्षा व्यवस्था वेगाने कोलमडत आहे. जगाच्या विविध भागात युद्धाचे वणवे पेटलेले असताना, अशा प्रकारचे लष्करी सराव करणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि प्रक्षोभक कृत्य आहे. जरी त्यांनी इराणमधील युद्धाचा थेट उल्लेख केला नसला, तरी जागतिक तणावाचा संदर्भ देत त्यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे.
उत्तर कोरिया आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि बाह्य धोक्यांचा सामना करण्यासाठी आपली लष्करी ताकद, विशेषतः अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमता सातत्याने वाढवत राहील. शत्रूंनी कधीही आमच्या संयमाची किंवा आमच्या क्षमतेची परीक्षा घेऊ नये, असा इशारा किम यो जोंग यांनी दिला आहे. लष्करी सरावामुळे जर प्रदेशातील स्थैर्य बिघडले, तर त्याला पूर्णपणे अमेरिका आणि दक्षिण कोरिया जबाबदार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर कोरिया आणि अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव हा नवीन नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अमेरिका इराणच्या संघर्षात व्यस्त असतानाच किम यो जोंग यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. काही जागतिक विश्लेषकांच्या मते, अमेरिका आपली काही लष्करी साधनसामग्री दक्षिण कोरियातून मध्य-पूर्वेतील युद्धासाठी हलवण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. याचाच फायदा घेत किंवा एकप्रकारे दबाव निर्माण करण्यासाठी उत्तर कोरियाकडून ही आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.