
भारताचे सौरऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. देशातील सर्वात मोठा दहा गिगावॅट एकात्मिक प्रकल्प आता नागपुरामध्ये तयार होत आहे. येथील औद्योगिक क्षेत्रात वारी एनर्जी लिमिटेडच्या या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे नागपूरची ओळख आता जागतिक सौरऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून होणार आहे. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात सहा हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून, भविष्यात ही गुंतवणूक तीस हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दोन हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. साधारण तीनशे एकर जागेवर हा प्रकल्प विस्तारलेला असून, पुढील अठरा महिन्यांत तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.
सौर इनगॉट आणि वेफर उत्पादनावर आतापर्यंत चीनची मोठी मक्तेदारी होती. मात्र, नागपूरमधील या प्रकल्पामुळे आता भारतातच या घटकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, चीननंतर जगातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरेल, ज्यामुळे भारताची आयात कमी होऊन निर्यातीला मोठी चालना मिळेल. भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मंजूर केलेल्या सात महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना अशा मोठ्या प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला मोठी गती मिळत आहे. मुख्यमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून आपण सोळा हजार मेगावॅटचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे थर्मल पॉवर प्लांटमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मुख्यमंत्र्यांच्या मते, सौरऊर्जेमुळे वीज दरामध्ये नऊ टक्क्यांहून अधिक घट होऊ शकते, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना आणि उद्योगांना होईल. तसेच, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. वारी एनर्जीज्चे अध्यक्ष हितेश दोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात या प्रवासाचा उलगडा केला. अकोला जिल्ह्यातील वारी या गावापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेला हा उद्योग समूह आज पंचवीस देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करत आहे. त्यांनी ग्वाही दिली की, हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करून नागपूरला सौर क्षेत्रातील जागतिक नकाशावर नेले जाईल. या सोहळ्याला अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार समीर मेघे, माजी खासदार अजय संचेती, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि वारी समूहाचे विरेंद्र दोशी, अंकीत दोशी, करण दोशी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.