हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार बर्फवृष्टी – चारशेहून अधिक पर्यटक अडकले

उत्तर भारतामध्ये सक्रिय झालेल्या तीव्र पश्चिमी विक्षोभमुळे हिमाचल प्रदेशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. गेल्या चोवीस तासांपासून मनाली, लाहौल-स्पिती आणि रोहतांग पास परिसरात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, जगातील सर्वात उंचावरील अटल टनेल परिसरात चारशेहून अधिक पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लाहौल खोऱ्याला मनालीशी जोडणाऱ्या अटल टनेलच्या दक्षिण आणि उत्तर पोर्टलवर अचानक बर्फवृष्टी वाढल्याने रस्त्यावर बर्फाचा जाड थर साचला आहे. यामुळे पर्यटकांच्या गाड्यांची चाके जागीच रुतली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबमधील पर्यटकांची संख्या मोठी आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तापमानाने उणे अंशात उडी घेतल्यामुळे पर्यटकांना श्वास घेण्यास त्रास होणे आणि थंडीचा कडाका सहन करणे कठीण जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुल्लू आणि लाहौल – स्पिती जिल्हा प्रशासनाने संयुक्त बचाव मोहीम हाती घेतली आहे. सीमा रस्ते संघटनेकडून रस्ते साफ करण्यासाठी स्नो कटर आणि अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी पर्यटकांना घाबरू नका, असे आवाहन केले असून ज्यांच्या गाड्या बर्फात अडकल्या आहेत, त्यांना सुरक्षित हॉटेल किंवा सरकारी विश्रामगृहात हलवण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मनाली ते केलॉन्ग दरम्यानची वाहतूक सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली असून, केवळ आपत्कालीन वाहनांनाच परवानगी दिली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे आणि पश्चिमी विक्षोभच्या सक्रियतेमुळे पुढील अठ्ठेचाळीस तास हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाची बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. यामुळे राज्यातील सुमारे दीडशेहून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या असून पाचशेहून अधिक ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत, ज्यामुळे अनेक गावे अंधारात आहेत. प्रशासनाने पर्यटकांना उंच डोंगराळ भागात न जाण्याचा आणि हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. एकीकडे बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचे हाल होत असताना, दुसरीकडे स्थानिक पर्यटन व्यावसायिक सुखावले आहेत. उशिरा झालेल्या या बर्फवृष्टीमुळे मनालीतील हॉटेल बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. मात्र, रस्ते बंद असल्याने पर्यटकांना पोहोचणे कठीण होत आहे. आम्ही पर्यटकांच्या मदतीसाठी सज्ज आहोत, पण निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञानही हतबल ठरत आहे, असे एका स्थानिक हॉटेल मालकाने सांगितले. हिमाचल प्रदेश सरकारने पर्यटकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. कोणत्याही संकटात सापडलेल्या पर्यटकांनी त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,428 वेळा पाहिलं