
सुरतमध्ये सध्या एलपीजी सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा सर्वाधिक फटका कापड उद्योगातील कामगारांना बसला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, हजारो कामगारांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतण्याचा मार्ग धरला आहे.
सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारताची मोठी गॅस आयात याच क्षेत्रातून होते. पुरवठा खंडित झाल्यामुळे सुरत आणि वडोदरा सारख्या शहरांत व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी पंधरा ते वीस दिवस थांबावे लागत आहे. सुरतच्या कापड गिरण्यांमध्ये काम करणारे बहुतेक कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा येथील आहेत. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे कामगारांना स्वतःचे जेवण बनवणे कठीण झाले आहे. गॅस टंचाईमुळे अनेक रंगकाम आणि छपाई कारखान्यांनी आठवड्यातून एक – दोन दिवस काम बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे. उधना आणि सुरत रेल्वे स्थानकावर गावी जाणाऱ्या कामगारांची गर्दी पाहायला मिळत आहे. कामगारांचे हे पलायन कापड उद्योगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
सुरतचा कापड उद्योग हजारो कोटी रुपयांची उलाढाल करतो. मात्र, कामगारांच्या कमतरतेमुळे उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही पावले उचलली आहेत. गॅस यंंत्रणेवर कडक नजर ठेवण्यासाठी अधिकारी नियुक्त केले आहेत. काही गिरणी मालक आणि सामाजिक संस्थांनी कामगारांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे. सरकारने पीएनजी जोडणी देण्याच्या कामाला गती दिली असून विद्युत शेगड्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.