काशिगाव मेट्रो स्थानक अखेर सज्ज
मिरा रोड – दहीसर परिसरातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो मार्गिका नऊ या मार्गिकेवरील काशिगाव मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होऊन ते आता प्रवाशांच्या वापरासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.
दहिसर ते मिरा-भाईंदर या मेट्रो मार्गिकेचे काम सुमारे सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला होता. पहिला टप्पा दहिसर ते काशिगाव आणि दुसरा टप्पा काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा होता. साधारण सात ते आठ महिन्यांपूर्वीच या मार्गावरील मेट्रोची तांत्रिक चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मेट्रो लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे आणि विशेषतः काशिगाव स्थानकाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे या मार्गाचे लोकार्पण रखडले होते. स्थानकाचे काम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने गेल्या काही महिन्यांपासून अतिरिक्त मनुष्यबळ आणि प्रगत यंत्रसामग्रीचा वापर करून काशिगाव स्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. आता हे स्थानक तांत्रिक आणि सौंदर्याच्या दृष्टीनेही तयार झाले आहे. स्थानकावरील अंतर्गत सजावट, विद्युत कामे आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात असून ते वापरासाठी सज्ज झाले आहे.
दहिसर ते काशिगाव हा टप्पा साधारण पाच किलोमीटरचा आहे. सध्या या प्रवासासाठी रस्ते मार्गाने गर्दीच्या वेळी एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांत पूर्ण होणार आहे. दहिसर चेकनाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा फटका मिरा-भाईंदरकरांना बसतो, त्यातून आता सुटका होईल. ही मेट्रो दहिसर येथे मेट्रो लाईन ७ दहिसर ते गुंडवलीला जोडली जाणार आहे. त्यामुळे मिरा रोड आणि भाईंदरमधील नागरिकांना थेट अंधेरीपर्यंत प्रवास करणे सोपे होईल. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी होईल आणि पर्यायाने खासगी वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषणही कमी होईल. काशिगाव स्थानक सज्ज झाल्यामुळे आता केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी मिळताच या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला केला जाईल. या आठवड्यात किंवा महिनाअखेरपर्यंत या मार्गाचे अधिकृत उद्घाटन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.