अवकाळी पावसाने सव्वासात हजार हेक्टरला फटका
नाशिक जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे सात हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. या संकटामुळे जिल्ह्यातील एक हजार एकशे ब्याण्णव गावे बाधित झाली असून सुमारे एकवीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या पावसाने द्राक्ष, कांदा, गहू आणि टोमॅटो पिकांचे सर्वाधिक नुकसान केले आहे. जिल्ह्यात सुमारे तीन हजार तीनशे सत्तावन्न हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला आणि साठवणूक केलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निफाड आणि चांदवड पट्ट्यात गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसला. पंचवीस ते तीस टक्के द्राक्षबागांचे लिलाव सुरू असतानाच या पावसाने बागांची पाने आणि फळे झडून पडली आहेत.
जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा या तालुक्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. चांदवडमधील वडनेर भैरव, बहादुरी, पारेगाव या भागांत हरभऱ्याच्या आकाराची गारपीट झाली. निफाड तालुक्यातील खानगाव आणि कोटमगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्षांचे वेल जमिनीवर कोसळले आहेत. देवळा तालुक्यात वादळी पावसामुळे उन्हाळ कांदा आणि डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. आधीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीमुळे आणि युद्धजन्य स्थितीमुळे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नाहीये. त्यातच आता या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. गांभीर्य लक्षात घेऊन कृषीमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंधरा तालुक्यांतील नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. हा अहवाल आता जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला मदतीसाठी पाठवण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ठोस मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. पुढील तीन – चार दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतात उभ्या असलेल्या उर्वरित पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीला आली आहेत, त्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.