
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा आणि युद्धाचा फटका भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला बसला आहे. भारताची प्रमुख विमान कंपनी एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील आपल्या सुमारे दोन हजार पाचशे उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत संदेशात या गंभीर परिस्थितीची माहिती दिली असून, कंपनीसमोर आर्थिक संकट उभे ठाकल्याचे संकेत दिले आहेत.
युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे, तर काही विमानतळांवरील कामकाज विस्कळीत झाले आहे. यामुळे एअर इंडियाला या भागात आपल्या नियोजित वेळापत्रकाच्या केवळ तीस टक्के उड्डाणे करणे शक्य होत आहे. इराण आणि आसपासच्या प्रदेशातील संघर्षामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव सत्तर टक्के उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. पश्चिम आशिया हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि व्यग्र हवाई मार्ग असल्याने या निर्णयाचा परिणाम हजारो प्रवाशांवर झाला आहे.
विमान उड्डाणे रद्द होण्यासोबतच इंधनाच्या किमतीत झालेली मोठी वाढ ही कंपनीसाठी चिंतेची बाब ठरली आहे. कॅम्पबेल विल्सन यांनी नमूद केले की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर दुप्पटीहून अधिक वाढले आहेत. या दरवाढीचा खरा आर्थिक फटका पुढच्या महिन्यापासून अधिक तीव्रतेने जाणवण्यास सुरुवात होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी कंपनीने नवीन तिकिटांवर आधीच इंधन अधिभार लावण्यास सुरुवात केली आहे. फक्त पश्चिम आशियाच नव्हे, तर युरोप, ब्रिटन आणि उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या विमानांनाही आता लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. युद्धक्षेत्र टाळण्यासाठी विमान मार्ग बदलल्यामुळे प्रवासाचा वेळ वाढला आहे आणि पर्यायाने इंधनाचा वापरही वाढला आहे. गेल्या वर्षीच्या ‘पहलगाम’ घटनेनंतर आधीच विमान मार्ग लांबले होते, त्यात आता या युद्धामुळे अधिक भर पडली आहे. यामुळे विमान कंपन्यांच्या ऑपरेशनल खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.
विमान तिकिटांचे दर वाढल्यामुळे प्रवाशांच्या मागणीत घट होण्याची भीती विल्सन यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक ग्राहक वाढीव भाडे देण्यास तयार नसतो. त्यामुळे किंमत वाढवण्यालाही एक मर्यादा आहे, अन्यथा प्रवाशांची संख्या घटेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दुसरीकडे युरोप आणि उत्तर अमेरिकेसारख्या काही बाजारपेठांमध्ये अद्यापही मागणी टिकून असल्याने तिथे कंपनी अतिरिक्त विमाने तैनात करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना अनावश्यक खर्च टाळण्याचे आणि बचतीचे धोरण अवलंबण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला अत्यंत शिस्तीने आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून काम करावे लागेल, असे विल्सन यांनी संदेशात म्हटले आहे. युद्धाचा हा भडका कधी शमेल यावरच एअर इंडिया आणि एकूणच जागतिक हवाई वाहतुकीचे भविष्य अवलंबून आहे.