ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

ओमानमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक महापुराने आतापर्यंत किमान अठरा जणांचा बळी घेतला आहे. ओमानच्या अनेक भागांत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनाने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे.

ओमान हा प्रामुख्याने वाळवंटी आणि डोंगराळ भाग असलेला देश आहे. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तिथे अभूतपूर्व पावसाची नोंद झाली. उत्तर अल शार्किया या प्रांताला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. डोंगरदऱ्यांमधून पाण्याचे लोंढे वेगाने सखल भागात आल्याने रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये झाले. अनेक कोरड्या नद्यांची पात्रे अचानक भरून वाहू लागल्याने नागरिक आणि वाहने त्यात अडकली. बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने इमारतींच्या छतावर अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली.

ओमान सरकारने पूराचा वाढता धोका लक्षात घेता देशातील बहुतांश प्रांतांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अशा कडक सूचना दिल्या आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये अंधाराचे साम्राज्य असून, रस्ते खचल्याने वाहतूक यंत्रणा ठप्प झाली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समिती या परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहे. तज्ज्ञांच्या मते, ओमान आणि शेजारील संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेला हा पाऊस हवामान बदलाचा थेट परिणाम आहे. आखाती देशांमध्ये एरवी वर्षभरात जेवढा पाऊस पडतो, तेवढा पाऊस केवळ एका दिवसात पडल्याने पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. राष्ट्रीय हवामान शास्त्र केंद्राने पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला असून, नागरिकांना नदीपात्रांपासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
406 वेळा पाहिलं