
हॉलिवूडमधील प्रतिष्ठित ‘A24’ स्टुडिओ पुन्हा एकदा एक असा चित्रपट घेऊन येत आहे, ज्याची चर्चा आतापासूनच जागतिक स्तरावर सुरू झाली आहे. अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री झेंडया आणि ‘बॅटमॅन’ फेम रॉबर्ट पॅटिनसन या दोन दिग्गज कलाकारांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे नाव आहे ‘द ड्रामा’. ‘ड्रीम सिनारिओ’ सारख्या हटके चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर बोर्गली यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी अमेरिकेतील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जगभरातील सिनेप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.
‘द ड्रामा’ हा केवळ एक साधा प्रेमपट नसून तो एक ‘रोमँटिक थ्रिलर’ प्रकारातील चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका अशा जोडप्याभोवती फिरते जे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या काही दिवस आधीच त्यांच्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित आणि भयानक घटना घडतात. ज्यामुळे त्यांच्या नात्याचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाते. या जोडप्याच्या आयुष्यातील काही धक्कादायक गुपिते आणि जुन्या जखमा अचानक समोर येतात, ज्यामुळे त्यांच्यातील प्रेम, विश्वास आणि भविष्यातील स्वप्नांची मोठी कसोटी लागते. नात्यातील क्लिष्टता आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक थरार हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असणार आहे
.या चित्रपटाची स्टारकास्ट अत्यंत तगडी असून झेंडया आणि रॉबर्ट पॅटिनसन यांच्यासोबतच अलाना हाईम, मामौडू अथी आणि हेली गेट्स यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका यात पाहायला मिळणार आहेत. झेंडयाने ‘युफोरिया’ आणि ‘डून’ सारख्या कलाकृतींमधून आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे तर रॉबर्ट पॅटिनसनने आपल्या प्रगल्भ अभिनयाने जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या दोघांची स्क्रीनवरची केमिस्ट्री कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ‘मिडसोमर’ आणि ‘हेरेडिटरी’ सारखे कल्ट चित्रपट देणारे अरी अस्टर या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यामुळे या कथेत काहीतरी अत्यंत वेगळे आणि अंगावर शहारे आणणारे पाहायला मिळेल याची खात्री मिळते.
तांत्रिकदृष्ट्या ही कलाकृती अत्यंत समृद्ध असणार आहे. दिग्दर्शक क्रिस्टोफर बोर्गली यांची मानवी भावभावनांच्या गडद बाजू मांडण्याची शैली या चित्रपटातही दिसून येईल. ‘रॉटन टोमॅटो’ सारख्या नामांकित व्यासपीठांवर ‘द ड्रामा’ची गणना २०२६ मधील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये केली जात आहे. लग्नाआधीचे ते भावनिक वादळ, मनात दडलेली रहस्ये आणि त्यातून निर्माण होणारा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरेल. असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.