झेंडू उत्पादक शेतकरी संकटात
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या झेंडू उत्पादक शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले असतानाच, दुसरीकडे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांचे दर प्रचंड प्रमाणात कोसळल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. लागवडीचा खर्च निघणेही कठीण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुलांवरून नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी, वाळुंजनगर, लाखणगाव आणि परिसरातील गावांमध्ये झेंडूची लागवड केली जाते. यंदा हवामान अनुकूल वाटत असतानाच गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने पिकाचे गणित बिघडवले. पावसाच्या पाण्यामुळे झेंडूच्या फुलांना बुरशी लागणे, फुले काळी पडणे आणि झाडे सडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे उत्पादनात घट झाली असून हातात येणाऱ्या मालाचा दर्जाही घसरला आहे.
सणासुदीचा काळ नसताना आणि लग्नसराई मंदावलेली असताना बाजारात फुलांची आवक वाढली आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त, अशा स्थितीमुळे झेंडूचे दर थेट तळ गाठू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पन्नास ते साठ रुपये प्रति किलो मिळणारा दर आता थेट दहा ते पंधरा रुपयांवर येऊन ठेपला आहे. फुलांची तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही या दरातून भागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आम्ही आशेने झेंडूची लागवड केली होती. औषध फवारणी, खते आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च झाले. पण आता बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने खर्चही निघणे मुश्किल झाले आहे, अशी व्यथा एका स्थानिक शेतकऱ्याने मांडली.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून फुलांच्या बागा फुलवल्या होत्या. मात्र, निसर्गाची अवकृपा आणि कोसळलेले बाजारभाव यामुळे हे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कृषी विभागाने या भागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.