पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील प्रमुख जलशुद्धीकरण केंद्रांच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे येत्या गुरुवारी, १६ एप्रिल रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पर्वती, वारजे, वडगाव, लष्कर, एसएनडीटी आणि होळकर यांसारख्या महत्त्वाच्या पंपिंग स्टेशनवर विद्युत आणि तांत्रिक कामे केली जाणार आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही देखभाल दुरुस्तीची कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाणीपुरवठा बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही दुरुस्तीची कामे चालतील. यामुळे गुरुवारी दिवसभर पुणेकरांना पाण्याचा पुरवठा होणार नाही. शहरातील जवळपास सर्वच भाग या पाणी कपातीमुळे प्रभावित होणार आहेत. शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज आणि धनकवडी, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ आणि कोंढवा बुद्रुक परिसर, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, कोथरूड, कर्वेनगर आणि वारजे हायवे परिसर, पुणे स्टेशन परिसर, मुळा रोड, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, खराडी, येरवडा आणि वडगाव शेरी या सर्व भागात पाणी कपात असेल.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, गुरुवारी दिवसभर पाणी नसल्यामुळे शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी सकाळी होणारा पाणीपुरवठा नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा होईल. तसेच, जलवाहिन्यांमध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे सुरुवातीला पाणी कमी दाबाने मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी शुक्रवारीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून पुणेकरांना आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी पाणी नसल्यामुळे नागरिकांनी बुधवारपासूनच आवश्यक तितकी पाण्याची साठवणूक करून ठेवावी. साठवलेले पाणी जपून वापरावे, जेणेकरून शुक्रवारी सकाळपर्यंत अडचण येणार नाही. देखभाल दुरुस्तीची कामे ही भविष्यातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.