नवी मुंबईत मालवाहतूक केंद्र उभारण्याची योजना
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदराच्या सानिध्यात एकात्मिक मालवाहतूक केंद्र उभारण्याची योजना सिडकोने आखली आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे व्यापार केंद्र म्हणून उदयास येणार असून, यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. हे मालवाहूक केंद्र नवी मुंबईतील खांदेश्वर आणि तळोजा परिसराच्या जवळ असलेल्या मोकळ्या जमिनीवर विकसित केला जाणार आहे. हा प्रकल्प प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूशी याची उत्तम जोडणी असणार आहे. शेकडो एकर जमिनीवर हा प्रकल्प पसरलेला असेल, ज्यामध्ये मालाची साठवणूक, वितरण आणि प्रक्रियेसाठी आधुनिक सोयीसुविधा असतील.
हा केवळ एक गोदामांचा समूह नसून, हे एक अत्याधुनिक केंद्र असेल. स्वयंचलित यंत्रणा आणि रोबोटिक्सचा वापर करून मालाचे व्यवस्थापन केले जाईल. रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई मार्ग या चारही माध्यमांतून मालाची ने-आण करणे सोपे होईल. नाशवंत वस्तू, औषधे आणि कृषी उत्पादनांसाठी विशेष शीतगृहांची सोय केली जाईल. सीमाशुल्क परवाना, बँकिंग आणि विमा यांसारख्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातील. सिडकोच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. देश-विदेशातील मालवाहतूक कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्या या ठिकाणी आपली केंद्र उघडण्यास उत्सुक आहेत. या पार्कमुळे सुमारे पन्नास हजारांहून अधिक थेट आणि दीड लाखांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे राज्य सरकार आणि सिडकोला करांच्या माध्यमातून महसूल मिळेल.
मालवाहतूक केंद्राच्या उभारणीसोबतच आजूबाजूच्या परिसरातील रस्ते आणि वीज पुरवठ्यात मोठी सुधारणा केली जाणार आहे. जड वाहनांच्या येण्या-जाण्यासाठी विशेष मार्गिका तयार केल्या जातील, जेणेकरून स्थानिक वाहतुकीवर त्याचा ताण पडणार नाही. सिडकोने या प्रकल्पासाठी जमीन वाटप आणि निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. पर्यावरण नियमांचे पालन करून आणि स्थानिक गावकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाईल. २०२७ पर्यंत या केंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे.