अन्नपूर्णा नदीतील गाळ उपशाबाबत ठराव
सिंधुदुर्गातील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेत दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीतील गाळ उपसा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. नाम फाऊंडेशनच्या वतीने एक मेपासून हे काम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी सभागृहात सांगितले. ही सभा गुरुवारी नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी गौरी पार्टन, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी, पाणीपुरवठा विभागप्रमुख चारुदत्त पारकर, शासकीय अधिकारी लक्ष्मण लौदे आदी यावेळी उपस्थित होते.
पाणीपुरवठा विभागप्रमुख चारुदत्त पारकर यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, अन्नपूर्णा नदीपात्रातील पाणीसाठा लक्षात घेता दोन दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास पंधरा जूनपर्यंत देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र उष्णतेचा प्रभाव अधिक राहिल्यास बाष्पीभवनामुळे हा पाणीसाठा कमी-जास्त होऊ शकतो, त्यामुळे काटेकोर नियोजन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहिबांव पंपहाऊस येथील जुनी गाळण दालन खराब झाली असून तेथे नवीन गाळण दालन उभारणे आवश्यक आहे. मात्र हे काम करताना किमान पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल. सध्याच्या परिस्थितीत पाणीपुरवठा बंद ठेवणे जनहिताचे नाही, त्यामुळे हे काम आगामी काळात करण्यात येईल, असे तन्वी चांदोस्कर यांनी सांगितले. शिरगाव-पाडाघर नळयोजनेची चार लाख सत्त्यात्तर हजार रुपयांची थकबाकी नगरपंचायत लवकरच भरणार असून त्यानंतर शिरगावचे पाणी देवगडला पूर्ववत सुरू होईल, असे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी सांगितले.
नगरसेवक शरद ठुकराल यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेशी झालेल्या करारानुसार देवगड-जामसंडे शहराला शिरगाव-पाडाघर योजनेचे पाच दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून हा पाणीपुरवठा आठवड्यातून दोनदा केला जातो. शहराला दररोज वीस दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याने शिरगावचे पाणी अपुरे पडू शकते. त्यामुळे नवीन गाळण दालनाचे काम आगामी काळातच करावे आणि तोपर्यंत गाळ उपसा करण्याचे नियोजन करावे असे त्यांनी सुचवले. यावर चर्चा होऊन गाळ उपसा व नवीन गाळण दालन उभारणीबाबत ठराव मंजूर करण्यात आला. जामसंडे सहकार नगराचे नामांतर श्री स्वामी समर्थनगर करण्याचा ठराव मंजूर झाला. नगरपंचायत हद्दीतील मक्तेदारांकडून अपूर्ण राहिलेली कामे पंधरा मेपर्यंत पूर्ण न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला. शिवनगर येथे मुला-मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचाही ठराव झाला. तसेच शहरातील अपघातप्रवण क्षेत्रात लावलेले अनधिकृत फलक तत्काळ हटविण्याचे निर्देश मुख्याधिकारी गौरी पार्टन यांनी प्रशासनाला दिले. या सभेत नगरसेवक संतोष तारी, तेजस मानघाडी, रुचाली पाटकर, मनिषा जामसंडेकर, विशाल मांजरेकर, आद्या गुमास्ते आदींनी सहभाग घेतला.