इंद्रायणी नदीतील जलपर्णी हटवण्यास सुरुवात
लोणावळा: लोणावळा शहरातून उगम पावून पूर्वेकडे वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीच्या पात्रात पसरलेली जलपर्णी हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपलेला असतानाही दीर्घकाळ हे काम रेंगाळले होते. अखेर नगर परिषदेने तातडीने हालचाली करत नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ केला आहे.
शहरातील काही नगरसेवकांनी या जलपर्णीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधून ती हटवण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. लोणावळा शहरातून जाणाऱ्या सुमारे साडेतीन ते चार किलोमीटर लांबीच्या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरली असून, संपूर्ण नदी जणू हिरव्या थराने झाकली गेली होती. सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून पुढील दोन महिन्यांत मान्सून दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
लोणावळा धरणापासून ते वलवण गावाच्या हद्दीपर्यंतचे संपूर्ण नदीपात्र सध्या या जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. कडक उन्हाळ्यामुळे काढलेली जलपर्णी उन्हात लवकर वाळून नष्ट होऊ शकते, हा तांत्रिक विचार करून काम सुरू करण्यात आले आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी गटार योजना राबवण्यात आली असली, तरीही मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीमध्ये जलपर्णीच्या वाढीला पोषक वातावरण मिळत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
पावसाळा अवघ्या एक महिन्यावर आल्यामुळे नगर परिषदेने केवळ नदीच नव्हे, तर शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेलाही गती दिली आहे. सुरुवातीला जलपर्णी काढण्याचे काम केवळ वरवर होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत आता मुळांपासून जलपर्णी काढणे आणि नदीतील गाळ उपसण्याचे काम जोमाने सुरू झाले आहे. ही काढलेली जलपर्णी नदीकाठावर न ठेवता ती इतरत्र हलवावी, अन्यथा पावसाळ्यात ती पुन्हा वाहून नदीत येईल, अशी महत्त्वाची सूचना नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.
नदीपात्रातील दाट जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटून जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या वनस्पतीमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी साचून राहते, ज्यातून डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. या सर्व पार्श्वभूमीवर, प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता नदी कायमस्वरूपी स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी लोणावळा परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.