
अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या नेदरलँड्स देशाचा ध्वज असलेल्या ‘एमव्ही होंडियस’ या आलिशान प्रवासी जहाजावर हंटा विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. या जहाजावर एकूण सात रुग्ण आढळले असून, त्यापैकी दोन रुग्णांना विषाणूची बाधा झाल्याची पुष्टी तपासणीनंतर झाली आहे. उर्वरित पाच जण संशयित रुग्ण आहेत. या संकटामुळे जहाजावरील प्रवाशांमध्ये सध्या भीतीचे मोठे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर आजारामुळे आतापर्यंत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण अत्यवस्थ आहे. तर इतर काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू प्रामुख्याने उंदीर आणि वस्तू कुरतडणाऱ्या इतर प्राण्यांच्या माध्यमातून पसरतो. सामान्यतः मानवांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते, असे स्पष्ट करण्यात आले असले आहे. तरी, जहाजावरील परिस्थिती पाहता प्रशासनाकडून अधिक सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
हे जहाज मार्च महिन्यात अर्जेंटिना देशातील उशुआया या ठिकाणाहून आपल्या प्रवासाला निघाले होते. अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिक महासागरातील काही दुर्गम बेटांना भेटी दिल्यानंतर, हे जहाज सध्या पश्चिम आफ्रिकेतील केप व्हर्डे या देशाच्या जवळ अडकले आहे. जहाजावर सुमारे दीडशे प्रवासी आणि कर्मचारी अडकून पडले असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्येच थांबण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्याच्या धोक्याचा विचार करून केप व्हर्डे प्रशासनाने या जहाजाला आपल्या बंदरात प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पेचप्रसंगामुळे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पर्यायी बंदरांचा शोध घेतला जात असून, स्पेन देशाच्या ताब्यातील कॅनरी बेटांवरील बंदरांचा विचार सुरू आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर संबंधित देशांचे आरोग्य अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणा सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
या विषाणूचा उगम जहाजावर नेमका कोठून झाला, याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हंटा विषाणू प्रामुख्याने उंदरांच्या विष्ठा, लाळ किंवा मूत्रातून पसरतो आणि काही अत्यंत दुर्मिळ प्रकारांमध्ये तो एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडेही जाऊ शकतो. मात्र, सर्वसामान्य लोकांसाठी या विषाणूचा धोका अत्यंत कमी असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने जनतेला दिलासा दिला आहे.