इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात
देहूगाव: तीर्थक्षेत्र देहूगावातील पवित्र इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, शहरातील सोसायट्या आणि परिसरातील गटारांचे मैला मिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या दूषित पाण्यामुळे वारकरी भाविकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला असल्याची स्थिती आहे.
ओढे, नाले आणि गटारांमधून थेट विसर्ग
काळोखे मळा परिसरातून येणाऱ्या ओढ्यात माळीनगरमधील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच दूषित पाणी पुढे इंद्रायणी नदीत मिसळत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पाण्याच्या टाकी परिसरातून, सिद्धेश्वर मंदिराजवळील भागातून आणि पोलीस चौकीमागील गटारांमधूनही मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
या सर्व ठिकाणांहून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रात घाणपाण्याचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. नदीकाठी असणाऱ्या परिसरात दुर्गंधी पसरल्याचेही सांगण्यात आले आहे.
एसटीपी चेंबर फुटल्याने दुर्गंधी वाढल्याचा दावा
काही ठिकाणी एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) साठी बांधलेले चेंबर फुटल्याने घाणपाणी थेट नदीत मिसळत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याचे म्हटले जात आहे. ओढे आणि नाल्याजवळ गेल्यास घाण पाण्यामुळे सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे श्वास घेणेदेखील कठीण होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
धार्मिक सोहळ्यांपूर्वी तात्पुरते उपाय, नंतर ‘जैसे थे’
प्रत्येक मोठ्या धार्मिक सोहळ्यापूर्वी प्रशासनाकडून तात्पुरते उपाय केले जातात. आढावा बैठका, सूचना आणि तात्पुरते बांध घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, सोहळा संपताच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
शासनाच्या श्रीक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत राबविण्यात आलेली भुयारी गटार योजना निष्फळ ठरत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत चिंता; आजारांचा धोका व्यक्त
दररोज हजारो भाविक आणि पर्यटक इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र समजून प्राशन करतात. मात्र, पाण्यात अस्वच्छ सांडपाणी मिसळत असल्याने कॅन्सर, जुलाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तातडीने सांडपाणी थांबवून कायमस्वरूपी उपायांची मागणी
इंद्रायणी नदीत सांडपाणी मिसळणे तातडीने थांबवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा इंद्रायणीची स्थितीही पवना नदीप्रमाणे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याशी शासन खेळत आहे का, असा संतप्त सवाल भाविक आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. सांडपाणी थेट नदीत सोडण्याचा प्रकार रोखण्यासाठी ठोस आणि सातत्यपूर्ण उपाय आवश्यक असल्याचा सूर स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.
टॅग्ज: #इंद्रायणी #देहूगाव #प्रदूषण #सांडपाणी #वारी #Maharashtra #PimpriChinchwad