
चीनच्या उत्तर भागातील शान्झी प्रांतात कोळशाच्या खाणीत रोजी भीषण वायूस्फोट झाला. यात किमान नव्वद कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. चांगझी शहराजवळील लिउशेन्यू कोळसा खाणीत शुक्रवारी सायंकाळी हा स्फोट झाला. दुर्घटनेच्या वेळी तब्बल दोनशे सत्तेचाळीस कामगार खाणीत काम करत होते. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत एकशे तेवीस कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. अनेक कामगारांना विषारी वायूचा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी दुपारपर्यंत काही जखमी कामगारांना घरी सोडण्यात आले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सातशेहून अधिक बचाव व वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत.
प्राथमिक तपासात खाणीत ‘कार्बन मोनॉक्साइड’ (एक प्राणघातक रंगहीन आणि गंधहीन वायू) या विषारी वायूचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. काही बचावलेल्या कामगारांनी स्फोटापूर्वी धुराचे लोट आणि गंधकासारखा तीव्र वास जाणवल्याचे सांगितले. जखमी कामगार वांग योंग यांनी माध्यमांना सांगितले की, अचानक धूर पसरल्यानंतर अनेक कामगार बेशुद्ध पडले. ते स्वतः काही वेळानंतर शुद्धीवर आले आणि इतर सहकाऱ्यांसह बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत सर्वतोपरी बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनीही औद्योगिक सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. दुर्घटनेनंतर संबंधित खाण कंपनीतील काही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शान्झी प्रांत हा चीनमधील प्रमुख कोळसा उत्पादन क्षेत्र मानला जातो. चीनमध्ये गेल्या काही वर्षांत खाण सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाल्याचा दावा केला जात होता. तरी अशा दुर्घटना सातत्याने घडत असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही दुर्घटना गेल्या सतरा वर्षांतील चीनमधील सर्वात भीषण खाण दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे. यापूर्वी २००९ मध्ये चीनमध्ये झालेल्या खाण स्फोटात शंभरहून अधिक कामगारांचा मृत्यू झाला होता.