वायू दलातील गरुड कमांडोजची प्रात्याक्षिके

भारतीय वायू दलाच्या गरुड कमांडोजचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. त्यानिमित्त, उत्तर प्रदेशातील बागपत येथील चंदीनगर वायू दलाच्या तळावरील ‘गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात’ शनिवारी ‘मरून बेरेट’ समारंभीय संचलन आयोजित करण्यात आले होते. हवाई दलाच्या विशेष मोहिमांसाठी तयार करण्यात आलेल्या या दलातील जवानांनी दीर्घ आणि कठोर प्रशिक्षणानंतर अधिकृतरीत्या विशेष दलात प्रवेश मिळवला.

या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून वायू दल संचालन विभागाचे सहाय्यक प्रमुख उपस्थित होते. गरुड प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून प्रशिक्षणाच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी नव्याने प्रशिक्षित झालेल्या जवानांचे अभिनंदन करताना बदलत्या सुरक्षा परिस्थितीत विशेष दलाच्या जवानांनी सातत्याने कौशल्य वृद्धी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वेळी यशस्वी जवानांना ‘मरून बेरेट’ (गडद तांबडी टोपी), गरुड प्रावीण्य चिन्ह आणि विशेष दलाच्या ओळखचिन्हांचे वितरण करण्यात आले.

समारंभादरम्यान गरुड जवानांनी विविध लढाऊ कौशल्यांचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये युद्धकालीन गोळीबार, ओलीस सुटका मोहीम, स्फोटक हल्ला तंत्र, अडथळे पार करणे, भिंत चढाई, दोरीच्या साहाय्याने उतरणे, तसेच लष्करी युद्धकला (मार्शल आर्ट्स) यांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांमधून जवानांची युद्धसज्जता आणि कठोर प्रशिक्षणाचे दर्शन घडले.

‘गरुड’ हे भारतीय वायू दलाचे विशेष दल असून त्याची स्थापना २००४ मध्ये करण्यात आली होती. देशातील महत्त्वाच्या हवाई तळांचे संरक्षण, दहशतवादविरोधी कारवाया, शत्रू प्रदेशातील शोध आणि बचाव मोहीम तसेच विशेष गुप्त कारवायांची जबाबदारी या दलावर असते. विशेष प्रशिक्षण, धैर्य आणि तांत्रिक कौशल्यासाठी हे दल ओळखले जाते. ‘मरून बेरेट’ टोपी ही विशेष दलाच्या सन्मानाचे प्रतीक मानली जाते.

हवाई दलाने सांगितले की, नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या विशेष जवानांमुळे दलाची कार्यक्षमता आणखी मजबूत होणार आहे. विशेषतः नव्या प्रकारच्या मोहिमा आणि बदलत्या युद्धतंत्राच्या पार्श्वभूमीवर ‘गरुड’ दलाची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे. या समारोहानंतर नव्या जवानांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून भारतीय हवाई दलाच्या विशेष शक्तीत आणखी भर पडली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
4,178 वेळा पाहिलं