जनगणनेचे काम टाळणाऱ्यांवर कारवाई
पुणे शहरात सुरू असलेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्याच्या कामाचा वेग कमालीचा मंदावला आहे. या दिरंगाईमुळे पुणे महानगरपालिका प्रशासन अत्यंत आक्रमक झाले असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि निष्काळजीपणा दाखवणाऱ्या प्रगणकांवर तसेच अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा केंद्र येथे एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहरातील विविध भागांत कार्यरत असलेल्या सुमारे एक हजार सहाशे पर्यवेक्षकांची उपस्थिती होती. या वेळी शहरातील सद्यस्थितीचा आणि सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठीकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सुमारे अकरा हजार प्रगणकांकडून जनगणनेचे काम सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष घरभेटी देणे आणि नागरिकांची माहिती गोळा करणे या प्रक्रियेची प्रगती समाधानकारक नसल्याचे उघड झाले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कामाचा वेग तातडीने वाढवण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
या बैठकीत कामकाज करताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजून घेण्यात आल्या, तसेच संगणकीय प्रणालीचा वापर आणि संपूर्ण कामकाज प्रक्रियेची पुनरावृत्ती करून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी जनगणना संचालनालयाचे सहसंचालक राजेश भोसले हे देखील उपस्थित होते. पर्यवेक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील प्रगणकांवर चोख देखरेख ठेवून दररोजच्या कामाचा अहवाल घेण्याचे आदेश या वेळी देण्यात आले.
जनगणनेचे साहित्य स्वीकारूनही अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करणारे, तसेच प्रशिक्षण वर्गांना विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने कर्तव्यावर हजर राहून काम पूर्ण करावे, अन्यथा संबंधितांवर ‘जनगणना कायदा 1948 अंतर्गत शिस्तभंग आणि थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.