तुकाराम मुंढेंनी नवीन पदभार स्विकारला
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मुंबई येथील या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने त्यांना तातडीने आदेश जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच्या पदावरून बदल झाल्यानंतर अखेर या नवीन पदाचा पदभार स्वीकारला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या एकवीस वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही पंचविसावी बदली ठरली आहे. नियमांवर ठाम राहणे, थेट निर्णयक्षमता आणि कामातील कडक शिस्त यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच त्यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिवपदावरून मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली होती. मात्र राजकीय घडामोडींमुळे त्यांना त्या पदाचा कार्यभार मिळू शकला नव्हता. ते दीड महिन्यांपासून नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.
तुकाराम मुंढे यांच्या या वारंवार होणाऱ्या बदल्यांमागे त्यांनी घेतलेले काही कठोर निर्णय कारणीभूत असल्याचे बोलले जाते. दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बोगस संस्थांविरोधात मोठी मोहीम उघडली होती. अनुदानाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करणाऱ्या काही संस्थांची सखोल चौकशी त्यांनी सुरू केली होती. या कारवाईमुळे अनेक संस्थाचालकांचे धाबे दणाणले होते आणि त्यांनी राजकीय नेत्यांवर दबाव आणून मुंढे यांची तिथून बदली घडवून आणल्याची चर्चा सुरू आहे.
त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागात झालेली त्यांची बदली देखील तिथे कार्यरत असलेल्या तत्कालीन प्रधान सचिव विनिता सिंघल यांच्या विरोधामुळे आणि राजकीय वजनामुळे थांबली होती, ज्यामुळे मुंढे यांना विनापद राहावे लागले होते. आता राज्य सरकारने मुंबईतील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे यांच्या जागी मुंढे यांची थेट वर्णी लावली आहे. श्रीधर डुबे यांची बदली आता मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या या नव्या नियुक्तीमुळे राज्यातील औषध दुकाने, उपहारगृहे आणि अन्नपदार्थ उत्पादकांवर प्रशासनाचा मोठा वचक निर्माण होणार आहे. याच आदेशासोबत शासनाने इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये आर. एस. चव्हाण यांच्याकडे हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, तर बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.