चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळाचे नियोजन

नासाने चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पुढील टप्प्यांची घोषणा केली आहे. या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर चालणारे रोबोटिक लँडर्स, उड्या मारणारे छोटे ड्रोन आणि विशेष वाहने पाठवली जाणार आहेत. ब्लू ओरिजिन ही अंतराळ कंपनी या मोहिमेसाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक म्हणून निवडली गेली आहे. याशिवाय इतर खाजगी कंपन्यांनाही या प्रकल्पाची कंत्राटे देण्यात आली आहेत.

मार्च महिन्यात नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अणुऊर्जा आणि सौरऊर्जेवर चालणारा एक कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी कार्यक्रमाची घोषणा केली होती. हा तळ सन 20232 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी वीस अब्ज डॉलरचा खर्च येईल. नासाचे मुख्य प्रशासक जॅरेड आइसॅकमन यांनी यासंबंधी बोलताना स्पष्ट केले की, या महत्त्वपूर्ण घोषणेचा अर्थ असा आहे की अमेरिका आता चंद्रावरील आपले वर्चस्व कधीही सोडणार नाही. या प्रकल्पामुळे अमेरिकेला चंद्रावर विविध वैज्ञानिक प्रयोग करणे, मौल्यवान संसाधनांचे उत्खनन करणे आणि भविष्यात मंगळ ग्रहावर जाणे अधिक सोपे होणार आहे.

नासाच्या या कार्यक्रमाचे नियोजन एकूण तीन टप्प्यांमध्ये करण्यात आले आहे. चंद्रावर मानवाला पाठवण्यापूर्वी तिथल्या अत्यंत कठीण आणि खडतर भूप्रदेशाचा नकाशा तयार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी रोबोटिक लँडर्स आणि ड्रोन पाठवले जातील. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीरांना प्रवास करण्यासाठी, तसेच दळणवळण आणि वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यासाठी विशेष वाहतूक वाहने पाठवली जातील. यातील पहिली मोहीम दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात नियोजित असून, याद्वारे वैज्ञानिक उपकरणे चंद्रावर उतरवली जातील, तर दुसऱ्या मोहिमेत अकराशे पाउंड पेक्षा जास्त वजनाचे साहित्य वाहून नेले जाईल.

या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यानुसार, दोन हजार बत्तीस सालापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला ‘निम-कायमस्वरूपी’ घरांमध्ये राहता येणे शक्य होणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव हा या मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे, कारण तेथील विवरांमध्ये गोठलेल्या अवस्थेत असलेले पाणी पिण्यासाठी आणि ऑक्सिजन तयार करण्यासाठी वापरता येऊ शकते. मात्र, अनेक अंतराळ तज्ज्ञांच्या मते नासाने निश्चित केलेली ही कालमर्यादा अत्यंत अवास्तव आहे. ‘ओपन युनिव्हर्सिटी’चे चांद्र शास्त्रज्ञ डॉक्टर सायमन बार्बर यांनी नमूद केले की, नासाला अंतराळवीर चंद्रावर उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहनांच्या निर्मितीत सातत्याने अडचणी येत आहेत, त्यामुळे या शर्यतीत चीन पहिल्यांदा चंद्रावर पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको.

या संपूर्ण योजनेमध्ये अनेक आव्हाने असली तरी नासा प्रशासक जॅरेड आइसॅकमन यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या एकोणीसशे बासष्ट मधील ऐतिहासिक भाषणाचा संदर्भ देत अंतराळवीरांचा उत्साह वाढवला आहे. त्यांनी सांगितले की, आपण चंद्रावर परत जात आहोत आणि तिथे कायमस्वरूपी तळ निर्माण करत आहोत. ही आता केवळ इतिहास जमा झालेली गोष्ट राहिलेली नसून आपण स्वतः नवीन इतिहास घडवत आहोत. विज्ञानाचा हा प्रवास पृथ्वीवरील मानवी जीवन सुधारण्यासाठी आणि नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
10,859 वेळा पाहिलं