
शालेय शिक्षणात केवळ अभ्यासक्रम शिकवणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांना सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी मूल्य आधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या मूल्यमापनाचा आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पद्धतीत गुणात्मक बदल घडवून निर्णय घेण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची अध्यापन पद्धती आणि त्यांचा विद्यार्थ्यांशी असणारा संवाद अतिशय महत्त्वाचा असतो. मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. जे विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि रंजक बनत आहे. हा सकारात्मक बदल लक्षात घेऊन या उपक्रमाच्या पुढील टप्प्यांची अंमलबजावणी अधिक वेगाने करावी. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, त्यांनी सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या बैठकीला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, मूल्यवर्धन उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे. या उपक्रमातून शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ होत आहे. या यशाची दखल केवळ राज्यानेच नव्हे, तर देशपातळीवरही घेतली गेली आहे. या प्रसंगी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी माहिती दिली की, शाळांच्या साप्ताहिक वेळापत्रकात मूल्याधारित शिक्षणासाठी स्वतंत्र दोन तास समाविष्ट करण्याची महत्त्वपूर्ण विचारधारा शिक्षण विभागाकडून राबवली जात आहे.
अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांचे अनुभव कथन या आढावा बैठकीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक हेमंत वसेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मूल्यवर्धन उपक्रमामुळे राज्यातील अध्यापन पद्धतीत झालेल्या गुणात्मक सुधारणांची सविस्तर माहिती दिली. या बैठकीत राज्याच्या विविध भागांतील प्राथमिक शिक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट जोडले गेले होते. यामध्ये प्रामुख्याने पुणे, यवतमाळ, नांदेड, पालघर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे वर्तन आणि शैक्षणिक दर्जात कशा प्रकारे सकारात्मक बदल घडले, याचे जिवंत अनुभव शिक्षकांनी या वेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
वरिष्ठ अधिकारी आणि भागीदार संस्थांची उपस्थिती या बैठकीला राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र आणि प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी उपस्थित होते. तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडिया बँक, बंधन बँक फाउंडेशन, फिरोदिया फाउंडेशन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन या भागीदार संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर होते. शांतीलाल मुथ्था यांनी या वेळी सांगितले की, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक या उपक्रमात उत्कृष्ट काम करत असून, शासनाकडून मिळणाऱ्या खंबीर सहकार्यामुळे या सामाजिक चळवळीची व्याप्ती आणि परिणामकारकता दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.