भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले

भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाले आहे. मात्र, दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग गरजेचे आहे. दर्शनासाठी काही नियमावली ही लागू करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मुख्य मंदिरासमोर नव्याने सभामंडप बांधण्यात आला आहे. शनिवारी या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर या परिसरामध्ये सुरू असलेल्या विकास, प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. प्रशासनाद्वारे सुरू असलेल्या कामाची गती आणि एकूण दर्जाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी कुंभमेळ्यापूर्वी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सुमारे नव्वद टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एक हजार भाविकांना प्रवेश

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले झाले आहे. यामुळे पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी दिसून आली. मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. दर्शनासाठी अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावे लागत आहे. प्रति दिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील.

परिसर विकास आणि ग्रामस्थांचे सहकार्य

मुंख्यमंत्र्यांनी शनिवारी विकासकामांचा आढावा घेतला. तीर्थक्षेत्रासाठी पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्याची यंत्रणेकडून अतिशय प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला मोलाच्या सहकार्य केले आहे. असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. हेरिटेज वाडी प्रकल्पांतर्गत सुमारे दीडशे घरे नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहेत. या बाधित नागरिकांसाठी शेजारीच सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे नवीन गाव वसविण्यात येत आहे.

पुनर्वसन आणि नवीन अर्थव्यवस्थेला गती

स्थलांतरित नागरिकांचे हे नवीन गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नाही. तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्राच्या परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी वाहतूक व्यवस्थेचे अत्यंत कोरीव आणि पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहे. वाहनांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र रस्त्यांची निर्मिती केली जात असल्यामुळे भविष्यात येथे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही. वयोवृद्ध तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी परिसरात विजेवर चालणाऱ्या वाहनांची विशेष सोय केली जाणार आहे.

भाविकांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज

या परिसरातील दुकाने, बसस्थानक आणि इतर सर्व सार्वजनिक सोयी-सुविधा अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने विकसित केल्या जात आहेत. यामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक आणि स्थानिक व्यावसायिक अशा दोघांच्याही आर्थिक व सामाजिक हिताचा समतोल विचार करण्यात आला आहे. या सर्व सर्वसमावेशक विकासकामामांमुळे भविष्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पटीने वाढेल, असा अंदाज वर्तवून मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,172 वेळा पाहिलं