एसटी प्रवासावर स्वच्छता अधिभार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आता प्रत्येक तिकीटधारी प्रवाशाकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार वसूल केला जाणार आहे. महामंडळाच्या या अजब निर्णयामुळे रत्नागिरीसह संपूर्ण राज्यभरातील प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या नवीन नियमानुसार, १५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासासाठी हे अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये अतिरिक्त अधिभार आकारला जाईल. आवडेल तेथे प्रवास किंवा मासिक पासधारकांकडून पाच रुपये अतिरिक्त अधिभार आकारला जाईल. लग्नसराई किंवा सहलीसाठी बुक केलेल्या बससाठी प्रति बस पन्नास रुपये शुल्क, विशेष म्हणजे, मोफत प्रवास करणाऱ्या पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांनाही या दोन रुपये शुल्क भरावे लागेल. या निर्णयामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मात्र दिलासा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे मासिक सवलत पास, अहिल्याबाई होळकर योजना, मानवी विकास योजना आणि सुट्टीच्या कालावधीत घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तिकिटांवर कोणताही स्वच्छता अधिभार लावला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासावर कोणताही अतिरिक्त भार पडू नये, याची खबरदारी महामंडळाने घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एसटीची स्वच्छता राखणे हे महामंडळाचे मूलभूत कर्तव्य आहे, त्यासाठी प्रवाशांकडून पैसे घेणे चुकीचे आहे, अशी भावना स्थानिक प्रवासी व्यक्त करत आहेत. जिल्ह्याभरातील अनेक बसस्थानकांची अवस्था आधीच दयनीय आहे; तुटलेल्या खिडक्या, फाटलेल्या सीट आणि अस्वच्छता यामुळे प्रवासी त्रस्त असताना हा नवीन भुर्दंड लादल्याने संताप वाढला आहे. गेल्या वर्षीच भाडेवाढ करण्यात आली होती, त्यानंतर आता स्वच्छतेच्या नावाखाली ही छुपी वसुली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
एसटी महामंडळाच्या बसेस दररोज सुमारे पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक करतात. प्रति प्रवासी दोन रुपये या हिशोबाने दररोज सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांची भर महामंडळाच्या तिजोरीत पडणार आहे. हा जमा झालेला निधी राज्यातील दोनशे एक्कावन्न आगार आणि पाचशे अठ्ठ्याण्णव बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी वापरला जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सध्या सफाई कामगारांची कमतरता असल्याने कंत्राटी पद्धतीने दर्जेदार स्वच्छता करण्यासाठी हा आर्थिक स्रोत निर्माण केला जात असल्याचे सांगण्यात आले. १५ एप्रिलपासून हा बदल लागू करण्यासाठी सर्व आगारांमधील ईटीआय मशिन्समध्ये तांत्रिक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांनी १५ एप्रिलपूर्वीच पुढच्या तारखेचे आरक्षण केले आहे, त्यांच्याकडून मात्र, हा दोन रुपयांचा फरक वसूल केला जाणार नाही.