लेबनॉनमधील दहा गावांना स्थलांतराचा इशारा

इस्रायलच्या लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील दहा गावांतील नागरिकांना तातडीने घरे रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. हिझबुल्ला संघटनेच्या हालचाली आणि शस्त्रसाठ्यांवर कारवाई करण्यासाठी हा इशारा देण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले. अरबी भाषेतील निवेदनाद्वारे नागरिकांना किमान एक हजार मीटर अंतरावर सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले. या इशाऱ्यानंतर सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केले आहे.

लेबनॉनमधील सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या इशाऱ्यानंतर दक्षिण भागातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले. काही भागांमध्ये स्फोटांचे भयंकर आवाज ऐकू आले. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायलने या कारवाया हिझबुल्लाच्या लष्करी ठिकाणांवर केंद्रित असल्याचा दावा केला असला तरी स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. सीमावर्ती खेड्यांमधून महिला, मुले आणि वृद्ध सुरक्षित भागाकडे रवाना होत आहेत.

दरम्यान, हिझबुल्लानेही इस्रायली सैन्याविरोधात प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने इस्रायलच्या उत्तरेकडील भागांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम लागू करण्यात आला आहे. तरी दोन्ही बाजूंतील संघर्ष पूर्णपणे थांबलेला नाही. सीमावर्ती प्रदेशात जवळपास दररोज चकमकी आणि हवाई हल्ले सुरू असल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, संघर्ष पुन्हा भडकू लागल्यापासून तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला, मुले, आरोग्य कर्मचारी आणि बचाव पथकातील सदस्यांचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या काही हल्ल्यांमध्ये वैद्यकीय पथकांवरही हल्ले झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्रायली कारवाईमुळे दक्षिण लेबनॉनमधील अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत.

अमेरिका आणि इतर देशांच्या मध्यस्थीने संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती अजूनही अत्यंत नाजूक आहे. इस्रायलने हिझबुल्लाच्या शस्त्रसज्ज हालचालींना थांबवण्यासाठी कारवाया सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत, तर हिझबुल्लानेही प्रतिकार सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात पुन्हा मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संघर्षामुळे पश्चिम आशियातील राजकीय आणि सुरक्षा परिस्थिती आणखी अस्थिर झाली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,646 वेळा पाहिलं